महावृत्त

उत्तर प्रदेश महापालिका निवडणूक; भाजपच्या ३६५६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये नुकताच झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले असले तरी संपूर्ण राज्यात भाजपच्या ३६५६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून २३६६ उमेदवार विजयी झाले आहेत. इथे विजयी उमेदवारांपेक्षा पराभूतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ही आकडेवारी इतर पक्षाच्या उमेदवारांपेक्षा जास्त आहे. पक्षाच्या सर्व जागा धरून विजयाची टक्केवारी ही ३०.८ टक्के इतकी आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपला फक्त ११.१ टक्के मतं मिळाली आहेत.विशेष म्हणजे, भाजपने या निवडणुकीत १२,६४४ पैकी ८,०३८ उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. यामध्ये सुमारे अर्ध्या जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे ६६४ उमेदवार विजयी झाले असून पराभूत उमेदवारांची संख्या ही १४६२ इतकी आहे.

उत्तर प्रदेशमधील महापौर पदाच्या १६ पैकी १४ जागांवर भाजपचा तर २ जागांवर बसपचा विजय झाला आहे. मीरत आणि अलीगढच्या महापौरपदी बसपचा उमेदवार विजयी झाला. तर अयोध्या-फैजाबाद पालिकेच्या महापौरपदी भाजपचे उमेदवार ऋषिकेश जयस्वाल यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे गुलशन बिंदू यांचा ३६०१ मतांनी पराभव केला होता.

वाराणासी पालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मृदुला या निवडून आल्या. त्यांनी काँग्रेसच्या शालिनी यांचा ७८,८४३ मतांनी पराभव केला. संयुक्ता भाटिया या लखनऊच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. तर कानपूरमध्ये प्रमिला पांडे यांनी विजय मिळवला. गाझियाबाद येथेही भाजपच्या आशा शर्मा यांनी विरोधकांना धूळ चारली.