महावृत्त

एसटीच्या विविध योजनांचे लोकार्पण

मुंबई - मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयांतील कर्मचाऱयांना शनिवारी नवीन गणवेश देण्यात आले. खासगी कंपनीकडून एसटीतील १६ विविध पदांवरील कर्मचाऱयांसाठी हे गणवेश घेण्यात आले होते. तसेच, एसटी महामंडळाची महाराष्ट्रात ६०९ बस स्थानके आहेत त्यापैकी ५६८ बस स्थानके सध्या कार्यरत आहेत. यातील ८० बस स्थानकांचे  नूतनीकरण येत्या वर्ष भरात केले जाणार आहे.

६ जानेवारी ही शिवसेनेसाठी ममता दिन आणि पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून एसटीच्या कर्मचाऱ्यांना नवीन लूक देणाऱ्या गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, परिवहन मंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे ते जे बोलतात ते करून दाखवितात, असा टोला लगावतानाच एसटीमध्ये जे अमुलाग्र बदल केले जात आहेत ती रावतेंची कामगिरी शिवसेनेला साजीशी आहे, असे सांगितले. तसेच, एसटीला जिवंतपणा देण्याच्या चांगल्या कामाबद्दल कौतूक केले. दरम्यान, जे कर्मचारी एसटी चालवितात, त्यांचा रखडलेला वेतन करार लवकरात लवकर करा, असा आदेश देखील दिला. तसेच, शिवशाही बस सुरू करून राज्यातील जनतेला किफायतशीर आणि आरामदायी प्रवास दिल्याबद्दल धन्यवाद देतानाच शिवशाहीचा ठसा आपल्या कामात देखील उमटवा, जेणेकरून अनेक वर्षानंतर देखील परिवहन मंत्री म्हणून दिवाकर रावते यांची आठवण काढली जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटीच्या कार्यक्रमात परिवहन मंत्र्यांना सल्ला दिला.

एसटीनेदेखील कॅशलेस व्यवहारावर भर दिला असून डिजिटलच्या युगात एसटीचे प्रवासी मागे राहू नयेत यासाठी स्मार्टकार्डची योजना येत्या १ मे पासून राबविण्यात येणार आहे. कामगार करार लवकरात लवकर करण्याची इच्छा आहे. परंतू, त्यासाठी कामगार संघटनांनी आपला हट्ट बाजुला ठेवत प्रशासनाशी चर्चेसाठी पुढे येऊन थोडीशी तडजोड करावी, असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीतील संघटनांना केले.

एसटीतील स्थानकप्रमुख, एसटी कार्यशाळा अधीक्षक, एसटी कार्यशाळा प्रभारक, हेड आर्ट, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, एसटी देखभाल करणारे अधिकारी-कर्मचारी, वाहतूक नियंत्रक, शिपाई, एसटी सहाय्यक (मेपॅनिक), या संवर्गातील प्रत्येकी पाच प्रतिनिधींना गणवेश वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दहा चालक, पाच महिला वाहक आणि पाच पुरुष वाहक यांनाही गणवेश देण्यात आले असून राज्यभरातील सुमारे एक लाख ८४५ कर्मचारी अधिकाऱ्यांना मार्चअखेर गणवेश मिळणार आहे, अशी माहिती एसटी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.