महावृत्त

अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून दहशतवादी बनलेला विद्यार्थी निलंबित

अलीगढ (उत्तर प्रदेश) अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी (एएमयू) ने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या एका पीएचडीच्या विद्यार्थ्याला युनिव्हर्सिटीतून निलंबित केले आहे. निलंबत केलेल्या या विद्यार्थ्याचे नाव मनान बशीर असे असून तो उत्तर काश्‍मीरच्या कूपवाडा जिल्ह्यातील लोलाब गावचा रहिवासी आहे. मनान बशीर याने अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीतून एमफिल केले आहे. आणि आता तो जिऑलोज़ी विषयात पीएचडी करत होता.

बशीर ५ जानेवारी रोजी दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती युनिव्हर्सिटीला मिळाली होती, मात्र सोशल मीडियावरील त्याचा एके-४७ सह फोटो व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सिटीने त्याच्यावर कार्यवाही करून त्याला निलंबित केले आहे. यापूर्वीही जम्मू-काश्‍मीरमधील अनेक युवक शांतीचा मार्ग सोडून दहशतवादाकडे वळलेले आहेत. आणि त्यातील काही परतून मुख्य प्रवाहात आले आहेत. काही दिवसांपूर्वी फुटबॉलपटू मजिद खान दहशतवादी बनला होता मात्र नंतर आपल्या मातेच्या आवाहनाला प्रतिसाद देत तो दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाला होता.