महावृत्त

चीनमध्ये समुद्रात जहाजांची टक्कर : कोट्यवधी डॉलरचे तेल बेचिराख

चायना - चीनच्या पूर्व किनाऱ्याजवळ ६  जानेवारी रोजी संध्याकाळी एका तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांची टक्कर झाली. त्या धडकेत नाविकदलापैकी ३२ जण नाहीसे झाले आहेत. बेपत्ता लोकांमध्ये ३०  इराणी आणि दोन बांगलादेशी नागरिक आहेत. ही धडक एवढी भीषण होती, की जहाजांच्या धडकेमुळे समुद्रात लागलेली आग दोन दिवस भडकली होती आणि यात कोट्यवधी डॉलरचे तेल बेचिराख झाले. दोन दिवसांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे, मात्र या घटनेमुळे पर्यावरणाला किती नुकसान झाले आणि किती तेलगळती झाली, याबाबत कोणताही आंकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

धडक झालेले तेलवाहू जहाज पनामा येथील असून ते इराणमधील सांची येथून अल्ट्रालाईट क्रूड ऑईल घेऊन दक्षिण कोरियाला जात होते. त्याची किंमत सुमारे ६ कोटी डॉलर एवढी असण्याचा अंदाज आहे. पूर्व चीन समुद्रात प्रवास करताना त्याची टक्कर सीएफ क्रिस्टल या हाँगकाँगमध्ये नोंदणी झालेल्या मालवाहू जहाजाशी झाली. क्रिस्टल जहाजाच्या चालक दलातील सर्व २१ जणांचा वाचविण्यात आल्याचे चीनच्या वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. हे जहाज अमेरिकेतून चीनमध्ये धान्य घेऊन जात होते. मात्र या दोन जहाजांच्या धडकेमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.