महावृत्त

पाटणा-मोकामा पॅसेंजरचे सहा डब्बे जळून खाक

पाटणा – पाटणा-मोकामा पॅसेंजरला काल, मंगळवारी रात्री उशिरा अकस्मात लागलेल्या आगीत पॅसेंजरचे सहा डब्बे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने घटनेच्यावेळी पॅसेंजर  रिकामी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. याबाबत रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शंटिंग लाईनमध्ये मोकामा-पाटणा फास्ट पॅसेंजर उभी असताना गाडीच्या मधल्या डब्यात अचानक आग लागली. या आगीत रेल्वेचे ६ डब्बे यात जळून खाक झाले. तर इतर काही डब्यांचे देखील नुकसान झाले आहे.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनात या घटनेमुळे एक गोंधळ उडाला. तसेच, घटनेच्या वेळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा तेथे उपलब्ध नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यास आणखी विलंब झाला.