महावृत्त

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कोकरनाग येथे काल, मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये फरहान वानी या पंधरावर्षीय विद्यार्थाचा समावेश आहे. कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी असलेला फरहान इयत्ता अकरावीचा विद्यार्थी होता. १४ जून २०१७रोजी घरातून क्लासला जाण्यासाठी निघालेला फरहान त्यानंतर कधीच घरी परतलाच नव्हता. मात्र, काही दिवसांनी तो हिजबुलमध्ये भरती झाल्याचे स्पष्ट झाले होते.

फरहान दहशतवादी संघटनेत भरती झाल्याचे समजताच पेशाने शिक्षक असलेले त्याचे वडील गुलाम मोहम्मद वानी यांनी फेसबुकवर फरहानसाठी भावनिक पोस्ट टाकली होती. फरहान, तू गेल्या पासून माझ्या शरीराने माझी साथ सोडली आहे. तू मला वेदना दिल्या आहेत. पण तू एक दिवस नक्की घरी परत येशील. मला एवढया लवकरच मरायची इच्छा नव्हती. पण आता माझ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. मला माफ कर, तुला आयुष्यात अजून खूप शिकायचे आहे. पण ते शिकवण्यासाठी मी या जगात नसेनअसे त्यांनी म्हटले होते.