महावृत्त

नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरुंना हज यात्रेची संधी

मुंबई - राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी समितीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये (बजेट) वाढ करणार असल्याचे आश्वासन अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. हज हाऊस येथे कांबळे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य हज समितीच्या हज यात्रा -२०१८ संगणकीय सोडतीद्वारे यात्रेकरुंची निवड करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.राज्यमंत्री कांबळे पुढे म्हणालेहज समितीमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. ही समिती प्रत्येक घटकातल्या व्यक्तीची मदत करण्यात अग्रेसर आहे. यामुळेच या समितीची अर्थसंकल्पीय तरतूद (बजेट) वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीमध्येही वाढ करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. राज्यासह देशभरातून हज यात्रेला दरवर्षी हजारो यात्रेकरु जात असतात. मागील वर्षी राज्यातील ९ हजार २४४ यात्रेकरुना ठराविक कोट्यातून हज यात्रेची संधी देण्यात आली होती. केंद्र व राज्य शासनाने या कोटा २० टक्क्यांनी वाढविला असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ११ हजार ५२७ यात्रेकरुना हज यात्रेची संधी देण्यात आली आहे. सातत्याने तीन वर्ष अर्ज करुन चौथ्या वर्षी हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध करुन देण्याची योजना बंद करण्यात आली असून ती पुन्हा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हज २०१८ साठी राज्यभरातून ४३ हजार ७७९ अर्ज प्राप्त झाले आहे. यापैकी १ हजार ९३९ जागा ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांकरिता आणि १६ महिला करिता जागा राखीव ठेवण्यात आले. उर्वरित ४१ हजार ८२४ यात्रेकरुमधून संगणकीय सोडतीद्वारे सुमारे ९ हजार यात्रेकरुची निवड  करण्यात आली.