महावृत्त

पाच महिन्यानंतर अजयसिंग आठवालच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार

ठाणे - तब्बल पाच महिन्यानंतर अजयसिंह आठवाल याचा मृतदेह त्याच्या  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. २९ ऑगस्टच्या पुरामध्ये अजय आठवाल हा वाहून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनी उरण येथे एक प्रेत सापडले होते. या प्रेताचा आणि त्याच्या आईचा डीएनए सामाईक झाल्यानंतर हे प्रेत आज, शुक्रवारी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. २९ ऑगस्ट रोजी ठाणे शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमध्ये दोन मुलींना वाचविण्याच्या प्रयत्नात रामवाडी, रामनगर येथे राहणारा अजय झिलेसिंग आठवाल हा तरुण वाहून गेला होता. अजय आठवाल हा विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. तर, पत्नी सध्या गर्भवती आहे. त्याचा शोध लागत नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी   जीवनरक्षक राजेश खारकर आणि भारिपचे शहराध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या मदतीने २७ सप्टेंबर रोजी राम नगर ते खाडी अशी शोधमोहीमही राबवली होती. दरम्यानच्या काळात उरण येथे एक मृतदेह सापडला होता. मात्र, या मृतदेहावर दोनजणांनी हक्क सांगितल्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली. गुरुवारी रात्री या डीएनए चाचणीचा अहवाल आल्याचे उरण   पोलिसांनी आठवाल याच्या कुटुंबियांना कळविले. त्यानुसार आज त्याच्या कुटुंबियांनी अजय आठवाल याचे प्रेत ताब्यात घेऊन अत्यंसंस्कार केले.  
दरम्यान, अजयसिंह आठवाल याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून सफाई काम करुन तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्यामुळे आता त्याच्या पत्नीला शासनाकडून निर्धारित केलेले अर्थसाह्य तत्काळ देण्यात यावे; ठाणे महानगर पालिकेच्या सेवेत त्याच्या पत्नीला सामावून घ्यावे, अशी मागणी भारिपचे शहराध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी केली आहे.