महावृत्त

न्यायव्यवस्थेच्या कारभाराबाबत न्यायमूर्तींचेच टीकास्त्र

नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेत लोकशाही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली. न्यायालयाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा असून, हे असेच सुरू राहिले, तर लोकशाही टिकणार नाही, अशी भीतीही त्यांनी या वेळी केली. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालया न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. आज,शुक्रवारी दुपारी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ,  न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे जेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी ही पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ आहेत.

 ‘सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीच मांडली. तसेच हे जर असेच सुरू राहिले तर लोकशाहीही टिकणार नाही, अशा शब्दांत सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांनी खदखद व्यक्त केली.