विशेष लेख

चॅनेलवाले कधी सुधारणार?


कुणी म्हणाल; हा सारा मिडीयाचाच दोष आहे. ती केस उचलून धरल्यामुळेच त्या तलवारला जमानत मिळू शकली नाही. तर एका चॅनलने; माहिती पूरविली; तुरुंगात काय काय सोयी तिला पुरविल्या गेल्या; ब्लँकेट, कपडे, खाण्यासाठी दाळ, रोटी आणि बटाटयाची भाजी! कुणी म्हणालं, जमानत मिळाली पाहिजे होती; कुणी म्हणालं नाही! आणि त्या निमित्ताने पून:एकदा जामनतीच्या कायद्यावर, वकिलांची जोरदार वादावादी देखिल टी.व्ही. वर झडली. वातावरण एकूणच अस होत आठवडाभर की; या महान देशात त्या दोन घटनेशिवाय दुसरं काही घडतच नव्हतं. फेसबुक वर एका मित्राने अपलोड केलेलं एक व्यंगचित्र, मी त्याच दरम्यान शेअर केलं, तर कांही जणांना कोण राग आला? सचिन; बॅट खुर्चीच्या बाजुला ठेवून, मस्तपैकी राज्यसभेत झोप काढतोय, अशा अर्थातच ते व्यंगचित्र होत. टाइम्स नाऊ चॅनेलने फेसबुकवर; त्याच नुपूर तलवार अटके प्रकरणी; रात्रीच्या होणा-या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली होती. मी प्रतिक्रिया दिली. या देशामध्ये रोजच्या रोज कुठे ना कुठे; कितीतरी खून होतात. ते खटलेही विविध कोर्टात चालू असतात. मग त्या आरुषी मर्डर केसचीच चर्चा रोज उठून कशासाठी? शेतक-यांच्या आत्महत्याकडे कुणी लक्ष देत का? हवं तर अमेरिकेत असतात, तशी नविन चॅनेलस निर्माण व्हावीत आणि त्यावर फक्त कोर्ट कामकाजच दिसावे. म्हणजे नेहमीची चॅनेल्स तरी अशा बातम्यापासून वाचतील. ही प्रतिक्रिया मात्र ब-याच जणांना आवडली; अर्थात फेसबुकवर! सचिन तेंडुलकरच्या बाबतीत मात्र हल्ली जरा जपूनच बोलावं लागत. राज्यसभेवर खासदार म्हणून गेल्यावर; भारतरत्नचा किताब त्याच्यापासून दूर जाईल, किंबहुना काँग्रेसची तीच चाल आहे, अशीही शंका कांहीना वाटते. लोकसभेचे माजी सेक्रेटरी जनरल सुभाष कश्यप तर म्हणाले; राष्ट्रपती ज्यांना अशी नेमणूक देतात त्यांच्याकडे चार निकषांची पात्रता असलीच पाहिजे. विज्ञान, संस्कृति, कला, साहित्य किंवा मग सामाजिक सेवा. सचिनला या चारपैकी कुठला निकष लागू होतो? घटनेतल्या नियमात बसते का हे? खरं तर या चारही निकषांच्या मुद्द्यावर घमासान चर्चा अपेक्षित होती; तशी ती झाली ही! यावर असही म्हणता येईल की; तेंडुलकरची बॅटींग मधले फटके मारण्याची पध्दत ही शास्त्रशूध्द आहे; त्याचे शॉटस हे कलात्मक असतात; मैदानावरच्या त्याच्या हालचाली या काव्यमय असतात आणि तो खूप मोठी समाजसेवा करीत असतो; कशी? तर तो आपले लक्ष देशापुढे असणा-या ख-या समस्यांवरुन अन्यत्र वळवितो. व्वा! क्या बात है! पण हे प्रकरण एवढ्यावरच मिटणारे नसते. भारताचे माजी ऍटर्नी जनरल सोली सोराबजी यांनी एक लेख याच विषयावर लिहून प्रतिपादन केले की; काँग्रेसने सचिनला खासदारकी बहाल केली म्हणून जी टीका होतेय ती दूर्देवी आहे. सचिन काय वा अन्य कुणी काय; केवळ एखाद्या पक्षाने राज्यसभेवर शिफारस केली म्हणजे त्या पक्षाचा काही लगेच प्रवक्ता होत नसतो. मात्र सोली सोराबजीनीही; साहित्य, कला, विज्ञान आणि समाजसेवा; यापैकी कूठल्या वा सगळयाच निकषात कसा सचिन बसतो, यावर बिनतोड युक्तिवाद केलाच. यातली तात्विक भुमिका अशी की, वरीलपैकी एखाद्या वा सगळयाच निकषात प्रशंसनीय कामगिरी बजावणा-या एखाद्या व्यक्तिला निवडणुकीच्या रणधूमाळीत पडायची इच्छा नसते. किंवा अण्णा हजारे म्हणतात तसं; निवडणुकीत भाग घेऊन निवडून येणे त्याला जमणारेही नसते. तरी देखिल अशा व्यक्तिची राज्यसभेसारख्या वरिष्ठ सभागृहातउपस्थिती गरजेची असते. का तर; त्यांच्या सहभागातून सभागृहातल्या निर्णयमक्षतेची, चर्चेची पातळी उंचावते. सोलींनी पुढे असाही युक्तिवाद केला की; राज्यसभेवरील नियुक्तीची आणि पद्मश्री, पद्मभूषण अशा पदव्यांची तुलना करणे ठीक नाही. राष्ट्रपतीनी नियुक्त केलेला खासदार हा पुढे चालून पद्म ऍवार्ड वा भारतरत्नचा देखिल मानकरी होऊ शकतो, मात्र अशा पदव्या मिळालेली व्यक्ति राज्यसभेवरील नियुक्त खासदार होईलच असे नाही; जोपर्यंत तो वरील चार निकषात बसत नाही. या गोंधळून टाकणा-या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सोली, पुढे काय म्हणतात ते तर जास्तच मनोरंजक आहे. समजा; एखाद्या व्यक्तिला वाचताही येत नाही आणि लिहीताही येत नाही. परंतू एखाद्या राष्ट्रीय आपत्तीप्रसंगी त्याने अशी काही कामगिरी केलेली असते की; अनेकांच्या सूरक्षिततेला आणि जिविताला त्याने वाचविलेले असते. अशा व्यक्तिला अगदी भारतरत्न साठी देखिल पात्र समजले जाऊ शकते. मात्र त्याच व्यक्तिला राज्यसभेवर नियुक्ति देवून कूठलाच हेतू साध्य होणार नाही. कारण तशा कुठल्या चर्चेत ती तिथ भाग घेऊ शकणार नाही. आता हा युक्तिवाद किती लंगडा वाटतो? तसंच असेल तर भारतरत्न लता मंगेशकरांच्या राज्यसभेवरील नियुक्तीचे समर्थन कसं करणार? तीच बाब सचिनलाही लागू होणार नाही काय? तेंडुलकरला खासदारकी दिली म्हणून साधारणपणे देशभर आनंद व्यक्त केला जातोय. पण कोर्टात या नियुक्तिला आव्हानही दिले गेलेय. कोर्ट काय तो निर्णय यथावकाश देईलही. मात्र या निकषात किक्रेट कुठे बसते? या मूद्द्यावर सोराबजींचे म्हणणे असे की; हे बरोबर असले तरी; नामवंत घटनापंडीत आणि माजी सरन्यायाधिश रंगनाथ मिश्रा वा फली नरीमन या सारख्या व्यक्तिंना राज्यसभेवर नियुक्ति मिळालीच होती की! मला तरी हा युक्तिवाद खरोखर फसवाच वाटतो. या दोन्ही व्यक्ति या नामवंत कायदेपंडीत होत्या त्यांची आजवरची सेवा ही समाजसेवा या सदरात मोडता येण्यासारखी होतीच. शिवाय देशापुढील जटील समस्या संदर्भात ते तिथं चालणा-या चर्चेत भाग घेवून, मार्गदर्शन करण्याची क्षमता बाळगून नक्कीच होते. सचिन तेंडुलकरबाबत असे कांही म्हणता येईल? उलट त्या व्यंगचित्रात दर्शविल्याप्रमाणे खुर्चीच्या शेजारी बॅट ठेवून तो झोपा काढण्याचीच शक्यता अधिक आहे. अन्यथा कमीत कमी वेळ तिथं तो उपस्थिती लावेल. क्रिकेट हा प्रकार कला या संज्ञेत बसतो असं काहींचे म्हणणे. खेळात देखिल ठरविल्याप्रमाणे कामगिरी पार पाडवयाची तर कसब लागतेच; म्हणून ती कलाच आहे. हे समर्थन देखिल केवळ हास्यस्पद वाटते. खेळासंबंधी एखादे विधेयक आले तर त्यावर सचिन चर्चा करेल वगैरेलाही काही अर्थ नाही. केवळ म्हणून राज्यसभेतली जागा अडविणे कितपत ठीक राहील? सचिनची नियुक्ति मुळात घटनेला धरून आहे की नाही; हा खरोखर वादाचा मुद्दा वाटतो. निदान सोली सोराबजी सारख्यांचा युक्तिवाद ऐकून तरी जास्तच! क्रिकेटसारख्या खेळात शिरलेला भ्रष्टाचाराचा कॅन्सर नष्ट करण्यासाठी जर एखादे बिल संसदेत आले तर त्यावर सचिन सारखा अनुभवी माणूस भाषण करील आणि ते बिल समंत करण्याची मदत करील; अशा त-हेच्या युक्तिवादावर तर हसावे का रडावे तेही कळत नाही. क्रिकेटर्स साठी, कोड ऑफ कंडक्ट म्हणजे वागणुकीचे नियम बनविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अशा एखाद्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून तो काम करु शकेल, या म्हणण्यालाही काहीही अर्थ नाही. आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या तेंडुलकरला राज्यसभेतल्या खासदारकीची शपथ घ्यायलाही सवड नव्हती. अशा स्थितीत; सोली सोराबजींनी सचिनकडून कूठल्या अपेक्षा कराव्यात; यालाही शेवटी मर्यादा आहेत. आयपीएल मध्ये काळा पैसा आहे. मॅच फिक्सिंगचे जूगाराचे आरोपही आहेत. पार्टी कल्चर आहे. अशा स्थितीत, आयपिएल मधल्या धावा वा आकडेवारी ही रेकॉर्ड मध्ये धरली जात नसतानाही, तेंडुलकर सारख्या खेळाडू तिथं का खेळतो आहे? याला काय उत्तर आहे आपल्याकडे? फेसबुकवर एक प्रश्न होता. पाचव्यांदा बुध्दीबळ स्पर्धेतली वर्ल्ड चॅम्पियन शिप जिंकणा-या विश्वनाथन आनंद याला आधी भारतरत्न द्यावे की सचिनला? या पोरकट प्रश्नाचे उत्तर देताना मी सरळ सरळ सांगून टाकले, या दोघापैकी कुणालाही भरतरत्न देण्याची चूक आपण करु नये. पंडीत नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस अशा थोर थोर नेत्यांनी आपले आयुष्य देशासाठी वेचले. तुरुंगवास भोगला समाजासाठी झीज सोसली. अशा महान व्यक्तींच्या पंक्तीत कुणाला बसवायचे, याचे थोडे तरी तारतम्य आपण बाळगणार की नाही? या महान देशासाठी बलिदान केलेल्या वीरांची, नेत्यांची यादी कमी आहे की काय? सचिन किंवा आणखी कुणी, कितीही मोठा खेळाडू असला तरी, त्याला वरील थोरांच्या पक्तिंत कसे बसविणार? आज सचिन झाला, तर मग उद्या सौरभ गांगुलीका नको? वर्ल्डकपमध्ये शेवटच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी नसता तर आपण जिंकलोच नसतो. मग त्यालाही भारतरत्न द्या, म्हणतील. मग द्रविड, कुंबळे यांना का नको? महान हॉकी खेळाडू ध्यानचंद आणि कपिलदेव, गावसकर यांनी काय पाप केले? ऑलिंपिक गोल्डमेडेल मिळविणा-या अभिनव ब्रिंदाला ते का नको? अशा गोष्टींना काही अंत राहील काय? आणि त्यासाठी खेलरत्न आहेच की! भारतरत्न कशाला हवे?