विशेष लेख

एफ.डी.आय. आहे तरी काय?

नोकिया ही एक विदेशी कंपनी आहे. त्यांचा एक ब्रँड आहे. नोकियाने विदेशी गुंतवणूक केली म्हणजे सिंगल ब्रँडमध्ये गुंतवणूक केली, असे मानले जाते. एका वस्तूचे उत्पादन करा किंवा विक्री करा. त्याला आमच्या सरकारचा विरोध नाही. किराणा दुकानात मात्र अनेक प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ, कपडालत्ता, भांडीकुंडी, बूटचपला, फळांचे रस, नाना प्रकारच्या वस्तू. या अनेक वस्तू एकाच ब्रँडने विकल्या जात असतील तर त्याला मल्टी ब्रँड असे म्हणतात. मल्टीब्रँड क्षेत्रात गुंतवणूकीला विरोध केला जात आहे. येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, सिंगल ब्रँडपेक्षा मल्टी ब्रँडच्या रिटेल क्षेत्राचा शेतीमालाशी अधिक संबंध येतो.

शेतीधंद्याचे स्वरूप आणि त्याबाबतचे कायदे नीटपणे तपासले तर आपल्या असे लक्षात येईल की, मल्टी ब्राँड रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीला अनुमती देणे शेतक-यांच्या हिताचे ठरेल. शेतीमालाची बाजारपेठ बंदिस्त आहे. येथे शेतक-यांना आपला माल इतरत्र विकता येत नाही, तो मार्केट यार्डातच न्यावा लागतो. मार्केट यार्ड पुढा-यांच्या बगलबच्यांच्या ताब्यात आहे. ही मार्केट कमिटी ज्या खरेदीदार वा आडत्यांना लायसन्स देते, तेच केवळ तेथे व्यवहार करू शकतात. हे पुढारी आपल्या बगलबच्यांना लायसन्स देतात. हे खरेदीदार आणि आडते सेट्टल करून शेतक-यांची लुबाडणूक करीत राहतात. लातूरच्या मार्केट कमिटीचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आले की, या मार्केट कमिटीच्या आवारात शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होते. हा सर्व व्यवहार फक्त साठ ते सत्तर खरेदीदार करतात. मार्केट कमिटीमुळे शेतीमालाच्या बाजारातील स्पर्धाच संपुष्टात आली आहे. मूठभर लायसन्सधारकांनी परिसरातील संपूर्ण शेतीमालाचे व्यवहार काबिज केले आहेत. शेतीमालाच्या खरेदीदारातील चुरस संपुष्टात आणण्याचे पाप मार्केट कमिटी कायद्याने केले. रिटेल क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेती मालातील खरेदीदारांमध्ये चुरस निर्माण होईल. आणखीन एक खरेदीदार बाजारात उतरणे, ही विक्रेत्याची संधी असते. हे साधे अर्थशास्त्र आहे. या आधारावरच थेट गुंतवणुकीचे आपण स्वागत करू शकतो.

रिटेल क्षेत्रातील थेट गुंतवणुकीचा दुसरा लाभ शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल हा होऊ शकतो. आपल्या देशात उत्पादित होणा-या फार थोड्या मालावर प्रक्रिया केली जाते. बराच माल वाया जातो. सडतो. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर त्याचे आयुष्य वाढते. ते जास्त दिवस टिकाऊ बनते. त्याची विक्रीमूल्य वाढते. लवकर नष्ट होईल या भितीने जो माल स्थानिक बाजारात मातीमोल भावाने विकणे भाग पडतो तोच माल दूरच्या बाजारात नेला जाऊ शकतो. यामुळे त्याची मागणी वाढू शकते. मागणी वाढल्याने त्याची किंमतही वाढते. शेतीमालावर प्रक्रिया झाली तर शेतक-यांना त्याचा लाभ मिळू शकतो. प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. साधी निकड असताना भाज्या जास्त दिवस टिकाव्यात यासाठी कोणत्या गावात सोय आहे? गावातील सोय तर लांब राहिली, जिल्ह्यात तरी आहे का? दुधासाठी तालुक्यात एक चिलींग प्लँट ठेवायची मारामार आहे. आमच्याकडे साधी गोदामे देखील पुरेशा प्रमाणात नाहीत. गोदाम किंवा चिलिंग प्लांट ह्या गोष्टी शेतीमाल सुरक्षित ठेवायच्या किमान गरजा आहेत. त्यापुढे प्रक्रिया उद्योगांचा विषय सुरू होतो. आमच्याकडे प्राथमिक सुविधादेखील निर्माण होऊ शकल्या नाहीत.

शेतीमालाच्या बाजारावर सहकारी क्षेत्राचा कब्जा आहे. सहकारी क्षेत्र अकार्यक्षमता, अव्यवस्थापन, भ्रष्टाचार यासाठी कुप्रसिध्द झालेले आहे. त्याकडून मोठ्या कामांची अपेक्षा करता येत नाही. अशा स्थितीत जर विदेशी गुंतवणूक होऊन शेतीमालावर प्रक्रिया करणा-या साखळ्या तयार होणार असतील तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे

विदेशातून कच्चा माल आणून भारतात त्यावर प्रक्रिया करणे विदेशी कंपन्यांना परवडणार नाही. त्या तुलनेत भारतात कच्चा माल विकत घेणे जास्त परवडेल. प्रक्रिया उद्योगांना नियमितपणे माल लागणार आहे. भारतीय शेतक-यांना त्यामुळे हक्काची बाजारपेठ निर्माण होणार आहे. विदेशातून मजूर आणून कोणतीही विदेशी कंपनी काम करीत नाही. ते केव्हाच परवडत नसते. या उद्योगांमुळे निर्माण होणा-या रोजगारांचा सर्वात जास्त फायदा आमच्या देशातील कष्टक-यांना होण्याची शक्यता आहे. प्रक्रिया उद्योगांना आवश्यक असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम शिक्षण व्यवस्थेला पार पाडावे लागेल. सध्या शिक्षण संस्थाच्या रुपाने सुरू असणा-या बेरोजगार निर्मिती करणा-या कारखान्यांना शिक्षणात अमुलाग्र बदल करावा लागेल.

बाप मरतो आहे. त्याला वाचविण्याची पोरात क्षमता नाही. अशा परिस्थितीत शेजारच्या गल्लीतील डॉक्टर येऊन जर उपचार करणार असेल तर आपण असे कसे म्हणावे की, तू विदेशी आहेस. आम्हाला आमच्या बापावर उपचार करायचे नाहीत. हो, हा डॉक्टर त्याची फी घेणार आहे. कोणतीही कंपनी, व्यापारी, धंदेवाईक संस्था नफा मिळावा यासाठीच धंदा करीत असते. ते नफा घेणार यात वाद नाही. डॉक्टराने फी घेऊ नये आणि मरणासन्न बाप तर वाचला पाहिजे असे होऊ शकत नाही. आम्ही त्यांची वाजवी किंमत द्यायला तयार आहोत. शेतकरी आज ज्या दुर्देशेत आहे, त्यातून तो बाहेर निघाला पाहिजे यासाठी भारताने पुढाकार घेतलाच पाहिजे.

सिंगल ब्रँड गुंतवणुकीला तुमचा विरोध नाही. कारण त्याचे लाभ तुम्हाला मिळणार. मल्टी ब्रँडचा लाभ जेव्हा शेतक-यांना होईल, असे दिसले तेव्हा तुम्ही त्याला विरोध सुरू केला. रिटेल क्षेत्रात एफ.डी.आय.ला विरोध ही काही पहिली वेळ नाही. जेव्हा केव्हा शेतक-यांच्या हिताचा विषय निघाला त्यात्या वेळी त्याला विरोध झाला आहे. हा विरोध जसा भाजपाचा आहे तसा तो कम्युनिस्टांचाही आहे, एवढेच कशाला अनेक काँग्रेसी खासदारांचाही आहे. खुद्द मनमोहन सिंग यांनाच उशिरा जाग येण्याचे कारण काय आहे? लाख लाख शेतक-यांनी आत्महत्या करून झाल्यावर हा डॉक्टर घरी आला. यावरून यांची नियत स्पष्ट होते.

पाकिस्तानी कलावंतांना घेऊन होणा-या टी.व्ही शोला मध्यंतरी एका पक्षाने विरोध केला होता. पूर्वी पाकिस्तानी खेळाडूंना मज्जाव करण्यासाठी खेळपट्टी उध्वस्त करण्यात आली होती. एरवी पाकिस्तान म्हटले की, आव असा आणला जातो, जशी यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. काही वर्षांपूर्वी कांद्याचे भाव वाढू लागले. बोंबाबोंब सुरू झाली. कांद्याचे भाव पाडावेत म्हणून सरकारने पाकिस्तानकडून कांद्याची आयात केली. हा कांदा मुंबईच्या डॉकयार्डमध्ये उतरविला गेला. मला वाटत होते, कोणी तरी आजचा बाबू गेनू डॉकयार्डावर जाऊन, पाकिस्तानचा कांदा भारतात येऊ देणार नाही असे म्हणून छातीचा कोट करून उभा राहील. पाकिस्तानी कांदा येऊ दिला जाणार नाही. परंतु दुर्देवाने तसे काहीच झाले नाही. उलट या कडव्या पकिस्तानविरोधकांनी पाकिस्तानहून आणलेला कांदा मिटुमिटु खाल्ला. मोठ्या कंठरवाने पाकिस्तानी खेळाडू आणि कलावंतांचा विरोध करणारे कोणीच मायचे लाल पाकिस्तानी कांदा अडवायला का गेले नाही? या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. भारतातील शेतक-यांशी कोणालाच काही देणे घेणे राहिलेले नाही. मात्र शेतक-यांचा लाभहोणार असेल तर एफ.डी.आय.ला विरोध करतील. बी.टी.कॉटनला विरोध करतील.बाकीच्यांचेसोडापरंतुकिमानशेतक-यांनीतरीहेवास्तवसमजावूनघेतलेपाहिजे

-अमरहबीब, अंबाजोगाई, जि.बीड
मो.9422931986

This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.