विशेष लेख

अमर हबीब,अंबाजोगाई,जि.बीड

भारतीय लोकशाहीत ही घराणेशाही का आली? कशी आली? एकेकाळी गावगाडयात बलुतेदारी पध्दत होती. इंग्रज आले आणि ती पध्दत संपुष्टात आली. इंग्रज गेल्यानंतर आपल्या देशाने लोकशाही राज्यव्यवस्था स्वीकारली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. आखाडयात पैलवान उतरतात तसे नवे नवे लोक राजकारणात उतरले. त्यांनी पदे भूषविली. सत्ता हे सेवेचे साधन नसून मेवा खाण्याचे आहे, हे ओळखायला वेळ लागला नाही. एकदा वाघाने माणसाचे रक्त चाखले की त्याला चटक लागते असे म्हणतात, त्याचप्रमाणे सत्ता 'भोग'लेल्यांना सत्ता सोडवत नाही. सत्ता कायम आपल्या ताब्यात राहवी, या इच्छेने नवी बलुतेदारी अस्तित्वात आली. बाप आमदार झाला की बेटाही वारसदार म्हणून पुढे येणारच. अशाप्रकारे राजकीय घराणी जन्माला आली.

बलुते वर्षाचे असायचे. गावचा सुतार वर्षाला एकदा येऊन एक पोतेभर धान्य घेऊन जायचा. राजकीय बलुतेदारी पाच वर्षांची असते. हे बलुतेदार पाच वर्षांनी एकदा येतात. त्यांना बलुत्यात मत लागते ! आपण एकदा ते दिले की पाच वर्षे ते आपल्याकडे फिरकत नाहीत. सुताराचा मुलगा जसे सुतार काम करायचा, तशाच प्रकारे पुढा-याचा पोरगा पुढारी होणार हे ठरलेले. बलुतेदारी जशी परंपरेने चालायची तशीच राजकीय बलुतेदारी देखील परंपरेने चालते.

अमेरिकेचा अध्यक्ष दोन टर्म पेक्षा अधिक काळ पदावर राहू शकत नाही, असा कायदा आपल्याकडे नाही. होण्याची शक्यताही नाही. कोणी कितीही वर्षे सत्तेत राहू शकतो. मरेपर्यंत सत्तेत राहायचे. जाताना पोराला वा पुतण्याकडे सोपवून डोळे मिटायचे. सत्तेचा एवढा मोह का असतो? पिढयान्पिढया ती हवीशी का वाटते? याचे साधे उत्तर आहे, सत्तेच्या द्वारे अधिकार आणि अधिकारात संपत्ती मिळते. मुळात सत्तेचा मोह कोणालाही नाही, संपत्तीचा मोह मात्र अती आहे. संपत्तीचा मोह भागविण्यासाठी सत्ता हवी असते. सत्ता हे सेवेचे साधन नसून ते भोगाचे साधन झाल्यामुळे त्यात घराणेशाही सुरु झाली आहे.

लोक विचारतात, काहो, महात्मा गांधी, एस.एम. जोशी यांची मुले राजकारणात का आली नाहीत? याचे साधे उत्तर असे की, या लोकांनी सत्तेकडे भोगाचे साधन म्हणून पाहिले नाही. ते आयुष्यभर जळत्या निखा-यावरून चालले. त्यांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबाची होरपळ अनुभवली. राजकारण म्हणजे चैन नसून त्याग आहे. असे निखा-यांवरुन चालणे कठीण आहे म्हणून या महात्म्यांची मुले राजकारणात आली नाहीत. पुढा-यांनी चो-या केल्या. चोरीच्या संपत्तीवर चैन-शौक करता येतात, हे या मुलांनी लहानपणापासून पाहिले त्यामुळे त्यांची मुले राजकारणाकडे खेचली गेली. चोराचा मुलगा चोर होतो. पण साधू संन्याशाचा संन्यासी होत नाही. असे म्हणतात ते खोटे नाही.

अनेक पाश्चात्य देशात आधी व्यापार खुला झाला. नंतर लोकशाही आली. आपल्या देशात नेमके उलटे झाले. आधी लोकशाही राज्यव्यवस्था आली आणि आता कोठे हळूहळू बाजार खुला होतो आहे. व्यापार खुला नसल्यामुळे अर्थव्यवहारावर सत्तेचा कब्जा राहिला. सत्तेच्या शिंक्यावर संपत्तीचा लोण्याचा गोळा असल्यामुळे, तो गोळा गट्टम करण्यासाठी बोके त्याच्या अवतीभोवती येणे अगदी स्वाभाविक आहे. एकेकाळी ज्या लोकसभा, विधानसभांमध्ये स्वातंत्र्यसैनिक दिसायचे त्याच सभागृहांमध्ये आता गुन्हेगार वावरताना दिसतात. जोपर्यंत सत्तेच्या शिंक्यावर संपत्तीचा लोण्याचा गोळा राहील, तोपर्यंत या बोक्यांना आवरणे शक्य नाही. लोण्याचा गोळा गट्टम करण्यासाठी त्यांना धार्मिक शिडी उपयोगी पडणार असेल तर ते कट्टर धार्मिक होतील. त्यांना जर सेक्युलर शिडी उपयोगाची वाटली तर ते तीही शिडी घेऊन लोण्याच्या गोळ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतील. राजकीय पक्षांचा धोरणांशी तलाक झाली असून त्यांचे रुपांतर सत्ताकांक्षी टोळ्यात झाले आहे.

मागस भागात प्रगतीच्या संधी नसतात. असल्यातरी फार थोडया. अशा वेळेस राजकारणाचा पर्याय अनेकांना बरा वाटतो. राजकीय पुढा-यांची जी बजबजपुरी माजली आहे ती याच बाबीचा परिणाम आहे. 'मागता येईना भीक, तर पुढारपण शीक' असे म्हटले जाते. पुढारपण हा बिनभांडवली धंदा. सुरुवातीला खालच्यांशी अरेरावी व बलिष्टांपुढे लाचारी करता आली पाहिजे. नंबर दोनचा धंदा करीत असाल तर उत्तम. नात्यागोत्याचे वर्तुळ मोठे असणे पुरक. लोकांना मुर्ख बनविण्याची कला तेवढी अंगभूत असली पाहिजे. हळूहळू जम बसत जातो.

हल्ली बांधकाम करणे म्हणजे विकास करणे मानले जाते. मागस भागाच्या विकासासाठी अनेक बांधकामे चाललेली असतात. त्यात अनेक गुत्तेदार गुंतलेले असतात. यापैकी अनेकजण पुढा-याच्या मुलाच्या नावाने काम करीत असतात. काही ठिकाणी पुढा-याचा मुलगा आपले नाव वापरत नाही पण हा चमचा पुढारी गुत्तेदार एखाद्या चाकरासारखा काम करतो. बहुतेक उदयोन्मुख पुढारी गुत्तेदारी करताना आढळतात.

इंजिनियर होऊन एखादी इंडस्ट्री टाकण्यापेक्षा बापाच्या आमदारकीचा लाभ घेऊन सहकारी संस्था काढणे केव्हाही आर्थिकदृष्टया परवडते. खाजगी कारखान्यात फटका बसला तर तो स्वत:ला बसतो. सहकारी संस्था बुडाली तरी बापाचे काहीच जात नाही. संस्था काढली की, लोकसंपर्क वाढतो आणि पुढारी होण्याचा मार्ग मोकळा होतो.

निवडणूक प्रक्रीया खूप खर्चिक झाली आहे. निवडणूकीतील खर्च कोणाच्या हाताने करायचा? एकटा उमेदवार सगळा व्यवहार करू शकत नाही. करायला लागला तर पकडला जाऊ शकतो. अशा वेळेस भरोश्याचा माणूस लागतो. राजकारणात कोणीच कोणावर भरोसा ठेवित नसतो. त्यासाठी हवा असतो घरचा माणूस. हे काम भाऊ, मुलगा, पुतण्या, असाच कोणी तरी नातेवाईक करतो. पैसे वाटण्याचे ट्रेनिंग झाले की तोही राजकारणात उतरायला पात्र ठरतो. बापाची निवडणूक होते, मुलाचे प्रशिक्षण. दोघांचे काम भागते. निवडणूकीतील अमाप खर्च हे देखील घराणेशाही निर्माण करण्याचे एक प्रमुख कारण आहे.

पुढा-यांच्या पोरांमध्ये नेतृत्वाचे उपजत गुण आभावानेच आढळतात. बुध्दीमत्तेच्या बाबतीत तर बोंबाबोब. बाप पुढारी नसता किंवा बापाची शिक्षण संस्था नसती तर बहुतेक जण दहावी पास झाले नसते. आता तेच एल.एल.बी. किंवा एम.बी.ए. झालेले दिसतात. या निव्वळ 'ढ' असलेल्या पोरांना राजकारणात स्थान मिळावे यासाठी नाना लटपटी-खटपटी केल्या जातात. शासकीय समित्यांवरील नेमणूक हा त्यातलाच एक प्रकार आहे. समाजात अनेक गुणवंत लोक असताना या पोरांना ही संधी दिली जाते. अनेकदा वाढदिवसासारखे कार्यक्रम घडवून आणून या पोरांना चमकण्याची संधी दिली जाते. हल्ली डिजीटल बोर्डांवर याच पोरांची थोबाडे प्रदर्शित केली जातात.

आगामी दहा वर्षात किती परिस्थिती बदलेल हे सांगता येणार नाही. परंतु जगात जे वारे वाहते आहे त्याचा अंदाज घेतला तर असे वाटते की, या 'भुरट्या' पुढा-यांचे दिवस आता भरत आले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातील कचराभरती कमी होईल. अलिकडच्या काळात वस्तुंच्या उत्पादनाबाबत जसे आपण आंतरराष्ट्रीय मानक लावायला लागलो, जसे साहित्याच्या बाबतीत विश्वस्तरीय दर्जाची अपेक्षा करू लागलो, अगदी त्याच पध्दतीने नेतृत्वाची सुध्दा कसोटी लागणार आहे. तसे झाले तर वावटळ शांत होताना जसा पालापाचोळा जमिनीवर पडू लागतो, अगदी तसेच पुढा-यांची पोरं राजकारणातून बाहेर फेकली जातील. इंग्रजांच्या आगमनानंतर गावगाड्यातली बलुतेदारी संपुष्टात आली तशीच आंतरराष्ट्रीय बदलांमुळे राजकारणातली बलुतेदारी संपुष्टात येणार आहे. माझा बाप पुढारी म्हणून मीही पुढारी, हा गबाळग्रंथी मंत्र कालबाह्य होणारच आहे. प्रश्न एवढाच आहे की, तो लवकर व्हावा यासाठी आपण काही करणार आहोत का?

- अमर हबीब
मो. 9४२२9३१9८६
email : This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.