विशेष लेख

खरी दिवाळी गावाकडचीच!

शिवाय परटीण असेच. दुपारच्या वेळेला बारा बलुतेदारांपैकी सुतार, नाभिक अशा मंडळीचा तर नेहमीच राबता असायचा. सर्वाचेच आपुलकीचे आणि जव्हाळ्याचे संबंध असत. शाळेत जाताना किंवा येताना लोहाराच्या भात्याजवळ तासन्तास बसून त्याचे काम कुतुहलाने बघत बसलेले मला आठवते. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाई वारे; अशी कुठलीही म्हण नंतर माहित झाली.

पण सोनारांचे काम कसे चालते ते प्रत्यक्षात तथे बसून आम्ही पाहलेले आहे. त्या काळात गावात हेअर कटींग सलून्सची भानगड नव्हती. नाव्ही घरीच येत असे. तोही आमचा विरंगुळ्याचा असा औत्सुक्यपूर्ण काळ असावयाचा. सगळ्या गावातल्या गुजगोष्टी तिथे कळायची सोय होती. दिवाळी दरम्यान पंचांग सांगायला ब्राम्हणही असेच. त्यांच्याही झोळीत काहीना काही टाकावे लागे. एकादशी कधी, द्वादशी कुण्या वारी, आमावस्या किती वाजा सुरु, भाऊबीज कशी या वर्षी लांबली; अशा गोष्टी आम्हाला त्यांच्याकडुनच कळत. गाव संपर्काची माध्यमे एवढय़ावर थांबत नसत; तर संध्याकाळी हलक्या शिंग्याची स्वारी असेच. कंदलाच्या उजेडात शिंग्याला रोटी वाढा जी अशी हाळी हमखास ठरल्या वेळी येई. ती एखाद्या दिवशी नाही आली की आजी गड्याजवळ चौकशी करीत असे.

एक-दोन दिवस सलग असे कुणी रिवाजानुसार आले नाही की, गड्याला किंवा अन्य कुणाला किंवा मलाच त्यांच्या घरी चौकशी करण्यासाठी पाठवून देत असे. दिवाळीचा उत्सव असला तरी या सर्व मंडळीच्या सहभागाशिवाय त्याची कल्पनाच करणे शक्य नव्हते. साधा फराळ असला तरी सर्वाचाच सहभाग त्यात राहायचा. दिवाळी म्हणजे ग्रामसंस्कृतीचाच एक अविभाज्य भाग होता. आता ती संस्कृतीच उरली नाही, तर मग दिवाळी कसली? वाड्यातच गोठा असे. संध्याकाळी जनावरे घरी येत. तो क्षण मोठ्या औत्सुक्याचा असे. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी. या चिरपरिचित ओळी त्यांच्यासाठीच तर होत्या. गायी म्हशींसोबत गुराखी आलाच. आणलेल्या फटाक्यांपैकी काही फटाके आमच्या गुराख्याला मिळाले की मगच आम्ही ते उडवायला सुरु करीत असू. गावात लक्ष्मीपुजनाला आणि पाडव्याला पानसुपारीला लोक बोलावत. जेवढी म्हणून काही दुकाने असत किंवा नव्याने उघडीत तिथे सगळीकडे भेट द्यावी लागे.

दिवाळी म्हटले की वाजंत्री आलेच. बँड वाजल्याशिवाय खर्‍या अर्थाने दवाळी आहे असे वाटायचेच नाही. दारात दुपारच्या वेळी बँड वाजला की, आम्ही सारे शेजारपाजारच्या मुलांसहत जमत असू. नंतरही गल्लीत बँडच्या पुढे-मागे किंवा सोबत काही काळ मिरवत चालणे ही आमची चैनच असायची. संस्कृती म्हणजे नेमके काय हे मुळातून समजून घेणे तसे सोपे नसते. ती अनुभवायलाच हवी. आता गावात हेअर कटींग सलून झाले आहेत. कारण नसताना मोबाईल्सचा सुळसुळाट झाला आहे. गरज नसताना निरनिराळ्या कंपन्यांचे टॉवर्स उभे राहले आहेत. घरातले गोठे आता गावाबाहेर शेतात गेले आहेत. तर काहींना ते नकोच आहेत. त्याऐवजी डीश अँटेनाच्या छत्र्या उगवल्या आहेत. घरातली माणसे एकमेकांना भेटण्याऐवजी मोबाईलवरुन शुभेच्छा देऊ लागली आहेत. तेही उपचार म्हणून! आपल्या गायी, म्हशी, वासरे किती याऐवजी टी.व्ही.वर चॅनल्स कोणती दिसतात याची आता चर्चा होते.

गावातल्या बसस्टॅण्डवर इतर सोयी कुठल्या नका का असेनात पण पेप्सी, थम्सअप, बिसलेरीच्या बाटल्या मिळतात. मग दुसरे काय होणार? पूर्वी लोक एकमेकांची विचारपूस करीत. सुख-दु:खात सहभागी होत. जवळीक होती, जिव्हाळा होता. पूर्वीही लोक दारु पित. पण दारुड्या कोण ते सार्‍या गावाला माहित असे. लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत. त्याचे काय मनावर घ्यायचे म्हणून गावात कुणाचा तरी नक्कीच धाक असे. वाटेल तसे वागायची मोकळीक कोणालाही नव्हती. काही संकेत होते, रुढी होत्या. परंपरा, चालीरिती असे सगळे सगळे अस्तित्वात होते.

ग्रामसंस्कृतीचा डोलारा कोसळला आणि मग चांगल्या परंपरा, रुढी, जिव्हाळा नष्ट होत चालला. गावातली पहाट उगवायची ती मोरांच्या मंजुळं केकावलीने. रात्रभर चालू असलेल्या व संपत आलेल्या भजनांनी व अभंगांनी प्रसन्न सुर्योदय व्हायचा. नष्ट होत असलेल्या ग्रामसंस्कृतीचा न सध्या थांबायचे नाव घेत नसलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा घनिष्ठ संबंध असल्याचे माझे तरी ठाम मत आहे. लोकांचा आपसांतला संवादच हरवत चालला आहे. लोक पूर्वी एकमेकाला धरुन होते. त्या बलुतेदारी पद्धतीचा समावेश असणारी गाव संस्कृतीच त्याला कारणीभूत होती.

गावातले प्रश्न गावातच मिटवायची क्षमता होती. पेरणीसाठी किंवा खतासाठी कुणी अडून बसण्याची प्रथा नव्हती. अगदी एखाद्याच्या शेतात पिकले नाही तर इतरांच्या कणगीतले धान्य हात घालून नेण्याची मुभा होती, हक्कदेखील होता. आज आपण हा सारा चांगुलपणा विसरत चाललो आहोत.

ड.प्रभाकर येरोळकर, लातूर
9860455785