विशेष लेख

जपून जपून शब्द.................!

काही मंडळी सहज म्हणून बोलतात, पण ते धारदार असत. तर काहीजण समोरच्याचा जराही विचार न करता अद्वातद्वा बोलतात. शा व्यक्ती मला बऱ्याचदा आत्मकेंद्री वाटतात. या जगात फक्त आपल्यावरच अन्याय झालाय असं त्यांना वाटत असतं. तर काही व्यक्ती अगदी विचारपूर्वक मोजकच बोलतात. एक तर त्यांना खरंच वेळ नसतो, त्यांचा प्रत्येक शब्द किंमती असतो किंवा त्यांना आपल महत्त्व दाखवायचं असत. अगदीच जपून जपून शब्द वापरणारी व्यक्ती भित्री, आत्मविश्वासाचा अभाव असणारी असू शकते.

सहज म्हणून ज्या त्या गोष्टीत बडबड करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात तसेच कामापुरत्या बोलणाऱ्या व्यक्ती देखील असतात. कुणी काम होईपर्यंतच बोलता. परत कधीही बोलाचाली होणार नसते, तर कुणी सतत भेटत असलं तरी कामापुरत बोलत राहतात. त्या व्यतिरिक्त संवाद म्हणजे त्यांना फालतू बडबड किंवा वेळेचा अपव्यय वाटतो. तर काही व्यक्ति ह्या काम नसलं तरी बोलत राहतात. आपल्या बडबडीचा इतरांना त्रास होतोय हे त्यांच्या गावीही नसत. आपण दुर्लक्ष केलं तरी त्या हाक मारून दुसऱ्याला बोलावतात. शा व्यक्ती एक तर खरंसाध्या असतात किंवा त्यांना आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याची गरज वाटत असते.

लहान मुलांचे बोबडे बोल प्रत्येकालाच आकर्षित करतात. तर काही व्यक्तींनी सतत बोलत रहावंसं समोरच्याला वाटत असतं. कारण कुणाची बोलण्याची पद्धत आवडते, तर कुणाचे विचार आवडतात. ते थांबूच नयेत. ऐकत राहावेत असं वाटत, तर काही अभ्यासू व्यक्तींचं बोलणं ऐकण्यासाठी गर्दी केली जाते.

कितीही प्रकार असले तरी संवादासाठी बोलणे हे आवश्यक असते आणि सुकर आयुष्यासाठी संवाद आवश्यक असतो. तो सुसंवाद होईल आणि विसंवाद होणार नाही याची काळजी फक्त प्रत्येकाने घेतली पहिजे, इतकं नक्की...

रश्मी महांबरे, मुंबई