विशेष लेख

अतिथी देवो भाव !

ज्याला तिथी नाही तो अतिथी..म्हणूनच वेळी अवेळी , कोणत्याही दिवशी येणाऱ्या व्यक्तीला अतिथी म्हणतात. त्याच स्वागत करतात.. आपल्यातले दोन खास बाजूला ठेऊन त्याला जेऊ घालतात. पूर्वी दळणवळणाची अनेक साधन नव्हती. मैलोंमैल पायी प्रवास असायचा नंतर मग फारतर बैलगाडी. आजूबाजूला खाण्याची वेगळी ठिकाणं, हॉटेल्स असे प्रकारच नव्हते त्यामुळे इतका प्रवास करून दमून भागून आलेल्या व्यक्तीला आधी पाणी आणि मग जेऊ घालायची पद्धत सुरु झाली असावी, कारण अशी वेळ प्रत्येकावरच यायची. जेवणाऱ्यालाही कसला संकोच वाटायचं नाही..'तुम्हाला उगीच आमच्या मुळे त्रास'अशी फॉर्मल वाक्य ऐकायला मिळायची नाहीत... कारण उद्या आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्याला जेवायला घालायला तो ही तयार असायचा. 'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे.. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत,' हा हि संस्कार आपसूकच होत असायचा.

काळ बदलला दळणवळणाची साधनं बदलली आणि मुख्य म्हणजे संदेश वाहनांची साधन वाढली... मनुष्य अधिक संपर्कात राहू लागला आणि एकमेकांशी अधिक बोलू लागला, अडीअडचणी सांगू लागला.. पण प्रत्यक्षात मात्र दुरावला. "अतिथी" ही संकल्पनाच नष्ट झाली अस मला वाटायला लागलं... प्रत्येकजण एकमेकाला कळवून एकमेकांकडे जायला लागले .. अचानक घडणाऱ्यातली मजाच त्यामुळे निघून गेली.. झटपट करायचे पदार्थ, क्षणात सुचणारी क्रिएटिव्हिटी या गोष्टी आपणच बाजूला झाल्या. सगळं कस प्लॅन्ड प्लॅन्ड.. पूर्व नियोजित.. त्यामुळे स्पॉण्टेनिटी कुठेतरी हरवली ... खरेपणा हरवलेले प्लॅन्ड बोलणं, प्लॅन्ड हसण ... उबग यायला लागला या सगळ्याचा ....

पण आज अचानक असाच एक अतिथी आला.. 'आहेस ना घरी... मी तुझ्या बिल्डिंगच्या खालीच आहे.. आलोच वर ' अस म्हणत ती व्यक्ती दोन मिनटात घरात पोहोचलेली.. सहज मनमोकळ्या गप्पा मारत बसली. मस्त चहा दे असं आधीच सांगून टाकलं . मी चहा बरोबर दिलेली दोन्ही सँडविच चाटून पुसून खाल्ली.. कशाला कशाला.. उगीच त्रास अस काहीही न बोलता.. मस्त झालं होत सँडविच असं तृप्तीने बोलून पुन्हा गप्पा मारत बसली.. आणि मलाही "अतिथी" भेटल्याचा आनंद झाला. 

रश्मी
महांबरे,

आर. जे.
१००.७ एफ. आम. गोल्ड