पुस्तक परिचय

'अपना स्ट्रीट'चे ते मंतरलेले दिवस

गंगा नदी काठची ती भव्य दिव्य यात्रा, प्रवास, यावर आधारित गंगा (रॅण्डम हाऊस, दिल्ली) आणि अमेय प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचेही ते लेखक आहेत. 'अपना स्ट्रीट' हे पुस्तक म्हटले तर एका चळवळीचा इतिहास आहे. म्हटले तर लेखकाच्या साक्षीने घडलेल्या कथा पुस्तकरूपाने एकत्रित आल्या आहेत. कदाचित ही कादंबरीवजा आत्मकथाही असू शकेल. सारं काही सत्य घडलेल्या घटनांवर आधारित आहे. एखादी चळवळ आणि त्यातून उद्भवणारे फलीत, याचे हे डाकूमेंटेशन अथवा दस्तऐवज असंही स्वरूप काहींच्या मते या पुस्तकाचे असू शकते. काय म्हणायचे ते म्हणा; परंतु मराठीमध्ये हे असं काही; दुर्मिळातलं दुर्मिळ असंच पुस्तक आहे. कुठल्याही पुस्तकाचे देखणेपण वा आकर्षण हे प्रथमदर्शनी तरी त्याचे मुखपृष्ठच असते. 'अपना स्ट्रीट'ला पाहताक्षणीच आपल्या नजरेत त्या पुस्तकाचे वैशिष्ट्यपूर्ण कव्हर पृष्ठ भरते हे सांगावयास नकोच.

१९८६ मध्ये मुंबईतील फूटपाथवर राहणारी काही माणसे, खास करून कष्टकरी, अडाणी, दारिद्रय़ महिला. त्यांच्या सुरक्षित निवार्‍यासाठी एकत्र आली. महिला मिलन ही संघटना स्थापन झाली. एका फूटपाथवासीयांच्या अकरा जणींच्या गटापासून सुरुवात झालेली ही चळवळ पंचवीस वर्षानंतर आज ओळख न पटण्याएवढी वाढलीय. संपूर्ण भारतामध्ये महिला मिलनच्या अनेक भगिनी संघटना तयार झाल्या असून इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून यातूनच एक आंतरराष्ट्रीय संस्था स्लम/श्ॉक ड्वेलर्स, आकारास आली. ही चळवळ आता तेवीस राष्ट्रांत कार्यरत असून दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण अमेरिका आदी भागांत पसरली आहे. या एकत्रित मुलींचे दुसरे फलीत म्हणजे 'निर्माण' ही एक मोठी बांधकाम कंपनी आकारास आली. जी या लोकांसाठी स्वस्तातली घरे बांधण्याचे काम संपूर्ण भारतात करते. केवळ महिलांच्या ज्यांना रेशनकार्ड म्हणजे काय, हे ही माहीत नव्हते. अशांच्या आत्मविश्‍वासपूर्ण लढय़ातून उभी राहिलेली ही चळवळ आणि त्या संघर्षपूर्ण कथेचेच चित्रण असलेले 'अपना स्ट्रीट' हे मराठी पुस्तक अनेकांना जगण्याचे बळ देईल, हे निश्‍चित!

पुस्तकाचे शीर्षक नाव तेच कायम ठेवलेय, कारण त्या नावातच एक परिणामकारकता आहे. 'अपना स्ट्रीट'ला मराठीत आणण्याची जिम्मेदारी मी स्वीकारली खरी पण मूळ इंग्रजी पुस्तक वाचत असताना लक्षात आले ते असे की, पुस्तकातील अनेक शब्दांचा आणि वाक्प्रचाराचा अर्थबोध आपल्या नेहमीच्या वापरातील कुठल्याच डिक्शनरीत मिळणे अवघड आहे. शिवाय संपूर्ण पुस्तक नि त्यातली भाषा ही वर्तमानकाळात होती. तिला जरूर तिथे भूतकाळाशी जोडणे भाग होते. सुरुवातीचे पंधरा दिवस मग या संदर्भात काहीच झाले नाही; पण मुंबईत सहज गेलो असताना दुबईहून आलेली एक डिक्शनरी दृष्टीस पडली आणि काम भागले; पण ती इंग्रजी टू इंग्रजी होती. एका इंग्रजी शब्दाला दहा समानार्थी इंग्रजी शब्द व अर्थ उपलब्ध होते. पुढचे काम मग सोपे होते. एखादे वाक्य वाचून त्या वाक्यात तो विशिष्ट शब्द वा वाक्प्रचार कशाकरिता योजिला असावा, हे शोधून काढणे तितकेसे कठीण नव्हतेच. तरीपण मूळ पुस्तक हे तब्बल तीनशे चौपन्न पानांचे होते. मग माझी पत्नी, सहधर्मचारिनी मदतीला आली. रोज साधारणपणे पहाटे पाच ते सात या वेळेत मी दिलेले डिक्टेशन मराठीतले रूपांतर प्रत्यक्षात कागदावर उतरविण्याचे काम पत्नीने चोख बजावले.

'अपना स्ट्रीट' या पुस्तकाचे एक वेगळे महत्त्व आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे लिहिलेय इतिहास म्हणजे काय असते? इतिहास म्हणजे जे काही असते ते घडून गेलेल्या गोष्टीच्या लिखित स्वरूपातल्या नोंदी. त्यावर आधारित अशी कागदपत्रे की, जी आपल्या भावी पिढय़ांच्या माहितीसाठी ठेवलेली असतात आणि काळाच्या ओघात व्यक्ती किंवा संघटना या टिकतात वा नष्ट पावतात; पण संग्रहित माहिती (डाटा) आणि भाष्य हे कायम राहते. आणि तोच आपला वारसा असतो. आज मराठीत 'अपना स्ट्रीट'सारखी किती पुस्तके आहेत? इतिहास सामान्यातल्या सामान्य अगदी फूटपाथवरील निवारा नसणारे जीवन जगणार्‍या आणि ज्यांना कुठले नावच नाही अशा कचरा गोळा करणार्‍या सडकछाप मुलांचा देखील असू शकतो. केवळ महापुरुषांनी घडविलेलाच नव्हे, हे जाणून घ्यावयाचे तर हे पुस्तक वाचून संग्रही ठेवलेच पाहिजे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही ही माणसे आपल्या देशातली जगतात करी कशी? भारत ही एक अशी प्रयोगशाळा आहे, की जिथे आयुष्य म्हणजे काय ते शिकता येते. संस्कृती, भाषा, धर्म, चालीरीती, आर्थिक व्यवहार, घरांच्या रचना, कलेचे, संगीताचे अनेकविध प्रकार, नृत्याचे, पोशाखांचे, ही सारी विविधता, प्रचंड आश्‍चर्यकारक, रोमांचक आहे. कारण ती समृद्ध आहे. एमेकाद्वितीय आणि जगात कुठेही नाही. म्हणून पाश्‍चिमात्यांना अस्वस्थ करणारी आहे. कारण प्रगत, विकसित राष्ट्रांत आपल्यासारखे प्रश्नच नाहीत. नळाला पाणी आठ आठ दिवस येत नाही, तरी आपण जगतोच की! आणि ज्यांच्याकडे नळच नाहीत व घर ही नाही, अशी ही माणसे आपल्याकडेच आहेत आणि ती ही जगतातच. एक जण म्हणतो, खरे शिक्षण अशाच परिस्थितीत मिळते, जिथे र्मयादेच्या आत माफक अस्वस्थता असते. सुखसोयीचा अभाव असतो.

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर 
9860455785