पुस्तक परिचय

'ज्ञाना तु का एक; चोख व मुक्त'

न्यायदानासारख्या पवित्र क्षेत्रात कार्यरत असताना, संत साहित्याचा प्रभाव असणे ही तशी अलौकिक बाबच म्हणावी लागेल. विशेषत: वरील पाचही संतांच्या रचनेचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडला आणि लहानपणापासूनच अध्यात्माची व परमेश्‍वर प्राप्तीची ओढ असल्याने परमेश्‍वराचे स्वरूप जाणून घेण्याची लेखकांची जिज्ञासा वाढतच गेली. त्याचदरम्यान सद्गुरू जंगलीदास माऊली यांची भेट झाली आणि अनुग्रह मिळाला. न्यायदानाचे कर्तव्य व दैनंदिन कर्म सांभाळून उर्वरित वेळात मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना व क्रिया सुरू झाली. लेखक बंडोपंतांच्या वाचनात, ज्ञानेश्‍वरी, एकनाथी भागवत, सर्व संतांचे अभंग, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांचे साहित्य, टिळकांचे गीता रहस्य, डॉ. सुहास पेठे यांचे साहित्य, रामकृष्ण मठाचे साहित्य व इतर अफाट ग्रंथसंपदा आली. लेखकाचे मन जिज्ञासेने भरून गेले. त्यांच्या अंतरंगात तरंग; प्रश्नांची आवर्तने निर्माण होऊ लागली. त्या सार्‍या प्रश्नांची उकल सद्गुरू यांच्या मौन वाणीतून, त्या त्या प्रसंगी झाली. सद्गुरूंची मौन वाणी अशी प्रसंगी, अनुभूती प्राप्त करून देत असे आणि त्याद्वारे मनातील सारे संशय दूर झाले. लेखकांची ज्ञानजिज्ञासा तृप्त झाली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून प्राप्त अनुभूतीवाटे काही रचना बंडोपंतांच्या हातून लिहिल्या गेल्या. सर्व लिखाण सद्गुरू जंगलीदास महाराजांसमोर ठेवले. त्यांनी ते वाचून लेखकाला लिहीत राहाण्याचा आदेशवजा आशीर्वाद दिला. सद्गुरूंची तळमळ ध्यानी येताच संतसाहित्य हे केवळ लोकप्रबोधनार्थ असल्याची तीव्र जाणीव लेखकाला झाली आणि त्यातल्या निवडक अभंगांचे निरूपण करण्याचे ठरले. संत ज्ञानेश्‍वर ते संत मुक्ताबाई, पुस्तकाच्या शीर्षक नावातल्या पाचही संतांनी हे दाखवून दिले की, परमेश्‍वर प्राप्ती ही सर्वांसाठी शक्य असते.
मूलत: लेखक का लिहितो, या प्रश्नाचे उत्तर शोधणे हे खरोखरच महाकठीण कर्म मानावयास हवे; परंतु बंडोपंत कुलकर्णी यांनी या पुस्तकाच्या मनोगतातून या प्रश्नाचे यथार्थ उत्तर त्यांच्यापुरते दिले आहे. गुरूमुखातून प्राप्त झालेले ज्ञान, संत साहित्य आणि प्राप्त अनुभूती या सगळय़ांच्या एकत्रित प्रगटीकरणातून निर्माण झालेले चिंतन, म्हणजेच या पुस्तकाचे लेखन होय. बंडोपंत विनम्रपणाने लिहितात, हा पुस्तकरूपी प्रय
जो काही आहे, तो माझे गुरू जंगलीदास माऊली यांच्या कृपाफळातून उद्भवलेला आहे. बंडोपंत म्हणतात, मी केवळ माध्यम आहे. ज्या काही चुका असतील त्या फक्त आणि फक्त माझ्यामुळेच घडलेल्या आहेत. संतमन त्यांच्या साहित्यातून आधी जाणले आणि मग निरूपण केले. आपला हा प्रयअगदी तोकडा असल्याचे नम्रपणे निवेदन करून, ज्ञाना तुकाराम, चोख व मुक्त हे पुस्तक परमेश्‍वर प्राप्तीच्या प्रयत्नात सर्वांना मार्गदर्शक ठरावे अशी सर्व संतचरणी आणि सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करून लेखकांनी हे पुस्तक पुन: परमेश्‍वर चरणीच सर्मपित केले आहे.
लेखकांचे मनोगत वाचणे हीच एक मोठी अलौकिक अशी अनुभूती आहे. तळमळीशिवाय कुठलीही साधना व्यर्थ होय. तुम्ही लेखक जे स्वत: न्यायाधीशही आहेत, त्यांच्या घरी गेलात तर सर्वत्र भिंतीवर संतांची छायाचित्रे लावलेली दिसतील. आधुनिक तंत्रज्ञानाशीही लेखकांनी स्वत:ला जुळवून घेतले आहे. फेसबुकसारख्या सोशल नेट वर्किंग माध्यमाद्वारेही सतत ते संतसाहित्य आणि त्यातून होणार्‍या प्रबोधनाचा प्रसार करीतच असतात. 

नावात काय आहे? असा प्रश्न शेक्सपियरने विचारला होता; परंतु नावात देखील बरेच काही गहन असू शकते हे या पुस्तकाच्या शीर्षकाने सप्रमाण दाखवून दिले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना अण्णासाहेब डांगे यांनी लिहिली आहे आणि तीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. माणसांच्या जीवनात योगायोगाला विलक्षण स्थान असते हे नमूद करून प्रस्तावनेत, म्हटलेय की, या ग्रंथांची प्रस्तावना लिहिण्याची विनंती लेखकांनी अहमदपूर येथील परम आदरणीय शिवलिंग शिवाचार्य स्वामीजींना केली. आणि ग्रंथ अवलोकन करून स्वामीजींनी अण्णा डांगेंची प्रस्तावना घ्या असे सुचविले. हा एक योगायोग आणि सद्गुरू जंगलीदास महाराजांचा आणि अण्णा डांगे यांचा चाळीस वर्षांपासूनचा परिचय, भक्तिभाव असणे हा दुसरा योगायोग. त्यामुळेच योगयाग विधी येणे नोहे सिद्धी। वायाची उपाधी दंभ धर्म।।
असे प्रस्तावनेत अण्णा डांगे विनम्रपणे नमूद करतात. ते म्हणतात, लेखक हे कायदेतज्ज्ञ असून न्यायदानाचे महान कार्य करतात. सबब न्यायदानाकरिता समोरील घटनेचे सर्व कानेकोपरे तपासून, घासून-पुसून आधी ते प्रश्न उपस्थित करतात आणि मगच त्यांची यथार्थ उत्तरे देतात.
पडिले वळण इंद्रियाशी सकळ, या उक्तीप्रमाणे बंडोपंतांनी ग्रंथाच्या नावातच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, अण्णा डांगेंनी या प्रश्नाचे उत्तर प्रस्तावनेत दिले आहे. अर्थात लेखकाचे खरे सार्मथ्य असे की, शीर्षकरूपी प्रश्नाची अनेक उत्तरे निघू शकतात. जो-तो वाचक आपल्या मगदुराप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करील.
लेखकाने जीवनाचा अर्थ समजून घेऊन ते कसे जगावे, हे पाच संतांच्या अभंगाचे निरूपण करून अगदी साध्या, सरळ, प्रवाही भाषेत आपल्यासमोर मांडले आहेत.

वेद, उपनिषदे असे ग्रंथ समजणे आणि ते आचरणे सोपे नाही. म्हणून लेखकांनी हा ग्रंथ सर्वसामान्यांसाठी सिद्ध केला आहे. या पुस्तकामध्ये तब्बल अडोतीस अभंग आणि त्यावरचे अत्यंत रसाळ असे निरूपण आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।
कर कटावरी ठेवूनिया।।

या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये नेमके परमेश्‍वरी तत्त्व काय आहे? निखळ शांती व आनंद मनुष्याला कोणत्या अवस्थेत प्राप्त होते? अशा आनंदाचा कंटाळा कोणाला कधी येईल का? परंतु हे ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण करणे असेल तर हे पुस्तक तुम्ही आधी वाचले पाहिजे. एकशे ऐंशी पानांचे हे रसाळ पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवून पुन: पुन: वाचले पाहिजे.
ग्रंथाचे मुखपृष्ठ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे।
भेटती पंढरीराणे शकुन सांगे।।
माऊलींची अपेक्षा तर लेखकांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केलीय. आता आपण तो वाचावा. संग्रही ठेवावा. कारण हा विषय कधीच संपणारा नाही आणि त्यावर कुठले अपीलही नाही.

ड. प्रभाकर येरोळकर, लातूर 
9860455785