पुस्तक परिचय

साहित्यविश्व दिवाळी

पिवळसर हिरव्यागार पार्श्वभूमीवरील 'साहित्यविश्व', ही ठळक अक्षरे 'सुसंवादातून सामर्थ्याकडे' या ब्रीदातून खंबीरपणे उभी असल्याचे जाणवते. पिवळसर हिरवा रंग हा संपन्नतेचा द्योतक! हिरवी शेती, हिरवे डोंगर ही 'हरितक्रांतीची बीजे'! या हिरव्या पार्श्वभूमीने नवीन आशावाद, जगण्याची उमेद दाखवत हळुवारपणे महाराष्ट्रातील सद्यस्थितीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. पावसावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील बळीराजा यावर्षी दुष्काळाच्या खाईत सापडलाय. त्याला जगण्याचे नवे बळ देत, वेगळ्या पध्दतीने दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न 'साहित्यविश्व, २०१५' ने केल्याचे जाणवते. दुष्काळावर मार्मिक भाष्य करणारी 'दावणीची गाय आता छावणीला पाठवलीय' ही कविता मुख्यपृष्ठावर चटकन नजरेत भरते आणि शेकडोंच्या गर्दीतला अंक हातात उचलून घेण्याचा मोह होतो.

 हातात घेतलेल्या अंकाची पानेही ग्लोईंग लूकमुळे अलगद उलगडली जातात. संपादकीय मधील प्रमिला जोशी यांचे मनोगत ह्दयातून आल्याचे जाणवते. खडतर परिस्थितीतून मार्ग काढीत पाचवा दिवाळी अंक सुपूर्द करताना त्या आनंदित होतात पण त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था आणि समाज जीवनाचा डोलारा ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्या किसानासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आर्त हाक देतात.

 'अंतरंग' या शिर्षकाखाली येणारे पान कलात्मकतेने ओतप्रोत भरलेले! त्यातील ठळकपणे छापलेल्या शब्दांवर नजर सरकते आणि जाणवते, ते म्हणजे 'दुष्काळ' या विषयाला प्राधान्य दिलेल्या या अंकात तात्पुरती मलमपट्टी नाही तर येथील शेती आणि शेतकरी, पिण्याचे पाणी यांसाठी दीर्घकालीन उपाय यावर भाष्य केले आहे.

हळूहळू लेख उघडताना पुस्तकाची पाने आपोआपपणे उलगडली जातात. सर्व पृष्ठांना असणारा ग्लोईंग लूक व उत्तम दर्जा सहजपणे जाणवतो. 'कलेने मला काय दिले?' या विभागात कला व्यक्तिला व पर्यायाने समाजाला समृध्द करीत असते. कलेचे ऋण व्यक्त करण्याचे काम आपल्या खास शैलीत कलाकारांनी केले आहेत. 'कलेनं सौंदर्यसृष्टी व्यापक केली' हा मुरली लाहोटी यांचा लेख, तर 'कलेन जीवनमान दिलं' या वैभव मांगले सारख्या गुणी व हरहुन्नरी कलाकाराचे मनोगत, 'कलेन सर्वार्थानं संपन्न केल' रामदास फुटाणे, 'कलेनं दिल, प्रेमाचं भरभरुन दान', रामदास पाध्ये, 'कलेन व्यापल अवकाश' पं.सुरेश तळवळकर, 'कलेनं आयुष्याला नवा अर्थ दिला' डॉ.सलील कुलकर्णी य सर्वांचे लेख किंवा मनोगते जणू कलादेवतेचे वेगळ्या पध्दतीने ऋण व्यक्त करुन, वाचकांची कला का जोपावयास हवी, याचे उत्तर देतात जणू!.

महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना दिवाळी साजरी करणे हे प्रस्तुत दिवाळी अंकाच्या संपादकांना मान्य नव्हते. त्यांनी यावर तोडगा काढण्याचे ठरविले. 'सामना दुष्काळाच्या झळांशी' या सदराच्या माध्यमातून तात्पुरती मलमपट्टी न करता महाराष्ट्रातील दुष्काळावर काही दीर्घकालीन उपाय मान्यवर लेखकांच्या व विचारवंतांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलेलाही दिसून येतो. एवढ्यावरच न थांबता अंकाच्या प्रकाशनप्रसंगी जाहीर करण्यात आले की, 'अंकाच्या विक्रीतून झालेला सर्व नफा दुष्काळग्रस्तांसाठी सुपूर्द केला जाईल!' 'दुष्काळ रोखायचा तर चोख पाणी वाटप हवे' भालचंद्र कानगो, 'उत्पादन खर्चावर आधारित भाव हाच पर्याय' डॉ.बुधाजीराव मुळीक, 'गरज तंत्र आधारित जलसंधारणाची' सुरेश खानापूरकर, 'पीक पध्दतीतील बदल रोखेल झळा' डॉ.अशोक ढगे, 'दुष्काळी स्थितीवर हवा, कायमचा इलाज' जे.एम.पाटील, 'दुष्काळग्रस्तांच्या मदतीबाबत हवे भान' डॉ.अशोक ढगे, 'दुष्काळावर मात करताना' मुकूंद गायकवाड, 'दुष्काळासोबत सावट इतर समस्यांचे' ओंकार काटले, 'मूळ दुखण्यावर दीर्घकालीन उपाय हवेत' डॉ.रामचंद्र सावले आदी लेखक, विचारवंत, जलतज्ञ, पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ कृषितज्ञ यांनी आपले बहुमोल मत मांडून शासनास विचार करण्यास भाग पाडले आहे.

दिवाळी म्हटलं म्हणजे अजून एका गोष्टीची त्यात भर पडते. 'सूरमयी दिवाळी किंवा सांगितिक दिवाळी!' 'एक मैफल रंगलेली' या सदरात मैफल रंगणे म्हणजे नेमके काय? मौनाची दाद ही हजारो टाळ्यांसमान असू शकते. रसिकांच्या डोळ्यांतील अश्रू ही सुध्दा फार मोठी दाद समजली जाऊ शकते. 'पुरिया धनश्रीने गाठलेली उंची', सुप्रसिध्द गायिका आरती अंकलीकर-टिकेकर 'दस्तुरखुद्द राष्ट्रपतींची पोचपावती' सानवी शेंडे, 'गप्पाष्टकांच्या अडीच तासांचा वन्समोअर' डॉ.संजय उपाध्ये, 'सतार गायकाच्या शाबसकीची थाप' पंडित उपेंद्र भट, 'सपोर्ट सिस्टिमच योगदान मोलाच' पंडित संजीव अभ्यंकर इत्यादी मान्यवर सुप्रसिध्द गायकांनी रंगत जाणाऱ्या मैफलिची कहाणी स्वत:च्या शब्दात मांडली आहे.

'कसोटी शिक्षण क्षेत्राची' यामध्ये नामवंत शिक्षणतज्ञ व लेखक यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. 'शिक्षणक्षेत्रासाठी सर्वंकष धोरण हवे' असे विचार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ऍ़ड.भास्करराव आव्हाड मांडतात, तर 'शिक्षकांच्या अध्ययनाचा दर्जा सुधारावा' असे शंकरराव मगर म्हणतात. 'शिक्षणक्षेत्रासाठी काळ कसोटीचाच' या लेखाच्या माध्यमातून अभय देशपांडे यांनी शिक्षणाची वर्तमान अवस्था अभ्यासपूर्ण मांडली आहे. भागा वरखडे यांनी 'कमी होईल का ओझे' या लेखातून दफ्तराचे ओझे कमी करण्याबाबतचे सूतोवाच केले आहे. 'ढासळती शिक्षण व्यवस्था हीच कसोटीची बाब' या लेखातून डॉ.अरुण निगवेकरांनी व्यथा मांडली आहे. तर 'गरज नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाची' मधून वैशाली गेडाम या प्रयोगशील शिक्षिकेने नव्या दृष्टिकोनाची गरज आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

साहित्यविश्वच्या संपादक प्रमिला जोशी यांनी 'शिरपूर पॅटर्न' या आपल्या लेखात शिरपूर येथील शैक्षणिक व औद्योगिक वाटचालीचा धावता पण सखोल आढावा घेऊन अशा प्रकारचा 'फॉर्म्यूला' राज्यातील इतर अनेक गावांसाठी, त्यांच्या विकासासाठी वापरण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 'संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस' या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेची माहिती लेखक सुधीर जोशी यांनी शब्दबध्द केली आहे. तर 'शिक्षणाचा खेळखंडोबा' मधून शांताराम कारंडे यांनी व्यथा मांडली आहे.

भटकंती किंवा प्रवास कुणाला बर आवडत नाही? निसर्गाच्या सानिध्यात भरपूर फिरावे आणि त्याच्या कुशीत निजावे अस प्रत्येक निसर्गप्रेमीची स्वप्न! यामध्ये 'ओढ पावसाची' 'जंगलात जीव रमतोय', 'वाघोबांची भेट झाली', 'मस्तवाल गव्याची सलामी' आणि 'साद घालिती डोंगरवाट' ही अनुक्रमे शेखर मानजकर, डॉ.अनिकेत आमटे, किरण पुरंदरे, डॉ.संजीव नलावडे व आपणा सर्वांचे लाडके अभिनेते 'भटकंती' फेम मिलिंद गुणाजी यांची प्रवासवर्णने प्रत्यक्ष आपल्याला दुनियेची सैर घडवतात.

'या वीटेपेक्षा दगडच बरा!' जयदेव डोळे, 'विटा जोडून रचू भक्कम इमारत' अतुल भातखळकर, 'या सरकारचा कारभारही असह्य' सुभाष वारे, 'विधायकतेची वीट रचली जातेय' पाशा पटेल, 'जनतेचा भ्रमनिरास करणारे' माया साईनकर, 'थोडेसे नवे, बाकी जुनेच!' जे.एफ.पटेल आदी राजकीय विश्लेषकांचे विश्लेषण आपल्याला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. नागरिक व सामान्यपणे मतदार म्हणून आपली वैचारिक बैठक घडविण्याचे काम या लेखांच्या माध्यमातून नक्कीच होते.

'कथा' सदरात उत्तम सदाकाळ, सिंधु दुभाषी, माया साईनकर, निरंजन घाटे आदी प्रथितयश साहित्यिकांच्या कथा मनाला भुरळ घालतात. कथा वाचनास सुरूवात करताच कथेचा शेवट काय बरं असेल, याची उत्कंठा कथा पूर्ण वाचेपर्यंत संपत नाही.

रमेश धनावडे हे नवोदित आणि प्रतिथयश साहित्यिकाचे नाव! चारोळी, कविता, ललितलेख, कथालेखन, वर्तमानपत्रातील स्तंभलेखनातील त्यांचा लिलया वावर! एका मान्यवर कार्पोरेट कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत असलेल्या या कविची 'कांदा तुपाशी.. .. ' ही कविताही शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करते. 'तुच माझा सखा,' 'आयुष्याचा हिशोब' या डॉ.शशी गायकवाड व डॉ.शांताराम कारंडे यांच्या कविताही अतिशय उत्तम आहेत. कवितांच्या जोडीलाच नामवंत व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांच्या व्यंगचित्रांनी खुसखुशीतपणा नक्कीच वाढवला आहे.

 पंचपक्वान्न म्हटले, की ताटात पापड, चिमुटभर मीठ, लोणचं हेही यायला हव बरं का! अगदी तसच, दिवाळी अंक खऱ्या अर्थाने परिपूर्ण करणारे सदर म्हणजे 'वार्षिक राशीभविष्य'! ज्योतिषी नारायण कारंजकर या नावाजलेल्या भविष्यवेत्याचे राशीभविष्य अगदी सरळ सोप्या व नेमक्या शब्दात आहे.

संपूर्ण दिवाळी अंकात 'काय आहे?' असा प्रश्न विचारण्यापेक्षा 'काय नाही?' हे शोधणे जास्त अवघड! संपादक सौ.प्रमिला जोशी यांची सहकारी मंडळी सहसंपादक रमेश धनावडे, सल्लागार डॉ.हेंमत पाठक, व्यवस्थापक धीरज जोशी, मुद्रितशोधन महेश कवळे, मुखपृष्ठ महेंद्रजी, तर राज पाठक-जाहिरात व्यवस्थापन, इशिता मयेकर यांची सजावट, मांडणी सर्वच अप्रतिम!

 सर्व बाजूंचा विचार करता बांधणी, कागद, मुख्यपृष्ठ, रेखाटन, मुद्रिशोधन, नामवंत लेखकांचे अस्तित्व व नवसाहित्यिकांचा वावर या सर्व बाबी दिवाळी अंक अतिउत्कृष्ठ होण्यास कारण आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता अंकाची किंमतही माफक असून वाचकांना पूरेपूर मोबदला देण्यास 'साहित्यविश्व २०१५' नक्कीच सक्षम व समर्थ आहे, यात तीळमात्र शंका नाही!