पुस्तक परिचय

समाज प्रबोधनात्मक विचारांचा प्रकाश देणारा कवितासंग्रह : काळोखातील प्रकाश

कविता हा साहित्य प्रकारातील एक महत्वाचा प्रकार आहे. कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त आशय सांगणारा, भावनाशील मन उलगडणारा कविताहा प्रकार साहित्यातील एक अलंकार आहे असे मला वाटते. संवेदनशील मनात कवितेचं फूल हे आपसूकच उमलतं.

कवी नरेंद्र अमृतराव वाकोडे हे अतिशय संवेदनशील मनाचे आहेत, हे त्यांच्या कवितासंग्रहातून दिसून येते. म्हणूनच त्यांच्या भावविश्वातून ह्या कविता फुलल्या. स्वतः अंध असूनही सगळीकडे अंधारच दिसत असूनही त्यांनी त्यांच्या कवितांमधून उदबोधक, समाज प्रबोधनात्मक विचारांचा प्रकाश समाज मनात उजळण्याचे पवित्र कार्य काळोखातील प्रकाशया कवितासंग्रहाच्या माध्यमातून केलेले आहे.

आजही मुलगी नको मुलगाच हवा’, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवाअसा आग्रह धरणाऱ्या लोकांना मुलगीया कवितेतून मुलगी झाली रडू नका’, ‘मुलगा मुलगी एकाच नाण्याच्या दोन बाजू, काही फरक पडत नाही नका लाजूअसे पोटतिडकीने सांगतात.

विज्ञानयुगातही आजारांसाठी, आपले महत्त्वाचे काम व्हावे यासाठी, लवकर श्रीमंत होण्यासाठी अशा काही ना काही कारणांसाठी भोंदूबाबाकडे जाणारे लोक आहेत. अशांना हे भोंदूबाबा हातोहात फसवतात, लुबाडतात अशा लोकांना कवी खडसावून सांगतात,

 

बाबाजवळ जाता कशाला

काय पाहिजे तुम्‍हाला

त्‍यांच्याजवळ आहे मसाला

बकरा बनवितात येणार्‍याला

काम केल्‍याशिवाय नाही फळ

श्रम हेच आपले बळ

बाबा करतात छळ

आपल्‍यालाच बसते झळ

 

जाती, धर्माचे स्तोम माजविणाऱ्यांसाठी धर्मया कवितेतून

 

माणूस नाही धर्मासाठी

धर्म आहे माणसासाठी

जात नाही जनावरांसाठी

पंथ नाही पाखरांसाठी असे म्हणतात

 

सर्व धरण चांगलेच असतात, आपण माणुसकीची शिकवण आचरणात आणली पाहिजे हे वैश्विक सत्य जाता जाता सांगतात. याचसारखी आयुष्यही कविता...

 

चांगले असावे कर्म

योग्य शोधावा पार्थ

तरच आयुष्याला अर्थ

 

असे म्हणत असतांना, “काय आणले येतांना? काय नेशील जातांना?” म्हणजेच माणूस रिक्त हस्ते येतो, रिक्त हस्ते जातो पण चांगले वागले तर त्याचा चांगला नाव लौकिक मागे रहातो हे जीवनाचे सार ही समजावून सांगितलेले आहे.

काम, क्रोध, मद, मत्सर इत्यादी षड्ररिपू मानवाचे खरे शत्रू आहेत. ते म्हणजेच रावण. हे मनातील रावण मारून मन स्वच्छ ठेवावे. व्यायाम करून, योग्य दिनचर्या ठेवून शरीर निरोगी ठेवावे, कुठलेली व्यसन असू नये. व्यायाम करून, योग्य दिनचर्या ठेवून शरीर निरोगी ठेवावे, कुठलेली व्यसन असू नये म्हणजे आपले जीवन हिरवळीचा श्रावणअसेल असेही कवी म्हणतात.

अडत कवितेत अडत दलाल शेतकऱ्यांचे किती नुकसान करतात व स्वतःचा फायदा करून घेतात, म्हणून अडत बंद करावी असे म्हणतात. यातूनच शेतकऱ्यांबद्दलची कळकळ दिसून येते.

अपंगदिन या कवितेतून अपंगाबद्दलची त्यांची संवेदनशीलता दिसून येते. म्हणूनच कवी म्हणतात,

 

त्यांना नियतीने मारले

पण ते नाही हारले

ते त्या त्या परीने लढते

 

जगण्याची धडपड करतात अशांना मदतीचा हात दिला पाहिजे, त्यांच्या मनाला दुखवू नका. त्यांना मुख्य प्रवाहात आणा असे त्यांचे कळकळीचे सांगणे आहे, झाड’, प्रतीक्षाइत्यादी कवितांमधून पर्यावरण प्रेम दिसते. गरीब’, ‘अन्याय’, लाचारी’, ‘चार गोष्टी’, ‘बेरंग’, ‘कमाईअशा कवितेतून सामाजिक जाणीव दिसून येते. आई-वडिलांना चंद्र-चांदणीअशी सुरेख उपमा दिली आहे. कवी नरेंद्र अमृतराव वाकोडे हे स्वतः अंध असल्याने शरीराचा कुठलाही एखादा अवयव नसला तर जीवनात किती अडचणी येतात हे अनुभवल्याने, ‘श्रेष्ठ दानया कवितेतून...

 

मरावे परी देह रुपी उरावे

त्‍यासाठी अवयव दान करावे

अवयव दान, महा अभियान

राबवा आणि जागवा

 

एकंदरीत सगळ्या कवितांमधून कवी नरेंद्र अमृतराव वाकोडे यांची सामाजिक जाणीवा प्रगल्भ असणारी दृष्टीदिसून येते. अंध असले म्हणून काय झाले, त्यांना स्वतःला अंतर्मुख होऊन समाजातील घटनांकडे पाहता येते व तशीच शिकवण ते आपल्या कवितांमधून समाजाला देतात. सरळ व सोप्या भाषेतील एकूण ५५ कविता या कवितासंग्रहात आहेत.

या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसेच आहे. काळोखातील प्रकाशहा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह असला तरी तो सर्वांना सामाजिक जाणिवांचा, उत्तम जगण्याचे भान ठेवण्याचा प्रकाश नक्कीच देईल. प्रत्येकाने एकदातरी हा कवितासंग्रह जरूर वाचावा असा आग्रह मी करते. कवी नरेंद्र अमृतराव वाकोडे यांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश उजळो ही सदिच्छा व्यक्त करत त्यांना व जयसिंगपूर येथील कवितासागर प्रकाशन संस्थेचे कार्यकारी संचालक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देते.

 

- प्रा. सौ. सुमन शिवानंद चंद्रशेखर

माजी अध्यक्षा - कवी कालिदास मंडळ, बार्शी

दूरध्वनी ९५४५०५४९३७  

 

कवितासंग्रह - काळोखातील प्रकाश

ISBN 978-81-934308-5-9

कवी - नरेंद्र अमृतराव वाकोडे

मूल्य - १००/- रुपये

प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील

प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर

दूरध्वनी - 02322 225500, 9975873569

ईमेल - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.