पुस्तक परिचय

वाचायलाच हवं असं ‘आकलन’

(सचिन परब)

एक अमर हबीब म्हणून आहेत. ते बीड जिल्ह्यात आंबेजोगाई येथे राहतात. ते स्वतःला कार्यकर्ता पत्रकार मानतात. असं असलं तरी आज त्यांची ओळख एक विचारवंत म्हणून आहे. त्यांची आठ नऊ पुस्तकं आलेली आहेत. त्यांची व्याख्यानं ठिकठिकाणी होत असतात. नव्या पिढीच्या धडपडणा-या तरुणांशी त्यांचा संवाद कधीच थांबत नाही. ते कार्यकर्त्यांना सोबत करतात. इंटरनेटसारख्या नव्या तंत्रज्ञानातून देशभरातल्या संवेदनशील लोकांना एकत्र आणतात. त्यामुळे विचारवंताचं लेबल चिटकवलेल्यांपेक्षाही त्यांचे विचार खूपच वेगळे असतात. मातीशी अधिक इमान राखणारे असतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणतंही बेगड न लावता हे विचार अगदी तुमच्या आमच्या भाषेत समोर येतात. ही सगळी वैशिष्ट्य घेऊन त्यांचं ‘आकलन’हे नवं पुस्तक आलंय. ‘आकलन’हा दीडशेहून थोड्या जास्त पानांचा तसा छोटासा लेखसंग्रह. त्यात अवघे चौतीस लेख आहेत. त्यातले बरेसचे चार पानांपेक्षा मोठेही नाहीत. त्यांनी हाताळलेले विषय आपल्या नेहमीच्या परिचयाचे आहेत. पण त्याकडे बघण्याची दृष्टी एकदम नवी आणि स्पष्ट आहे. विविध विषयांवर नेहमीच्या पद्धतीने विचार करणंही ते जाणीवपूर्वक टाळतात. उदाहरणार्थ खासगी वाहतुकीला चोरटी वाहतूक म्हणणं यात कोणालाच चुकीचं वाटत नाही. पण ते त्याला एका वेगळ्याच अंगाने पाहतात. खासगी वाहतुकीचे अनेक लाभ ते आपल्याला पटवून देतात. लेख वाचून संपेपर्यंत हे एकूण समाजाच्या भल्याचं कसं आहे, यावरही आपण त्यांच्याशी सहमत होतो.

अधिक वाचा:वाचायलाच हवं असं ‘आकलन’

विश्वकर्मा : पांचाळ समाजाच्या अस्तित्वाचा शोध

विश्वकर्मा पांचाळ समाजाच्या अस्तित्वाची ही कहाणी सौ.वंदना साळसकर-साखळे यांनी पुस्तक रूपाने प्रकाशित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या संदर्भातील सर्व लेखन वजा संशोधन सौ. साळसकर-साखळे यांचे सासरे कै. दीनानाथ साखळे यांनी केलेले आहे. अतिशय परिश्रमपूर्वक आणि संशोधकाचा कोणताही आविर्भाव न आणता अत्यंत सरळ साध्या सोप्या भाषेत, सहज लेखन शैलीत पांचाळ समाजाच्या इतिहासाचा तसेच त्याच्या उत्पत्तीचा मागोवा घेणारे हे पुस्तक पांचाळ समाजाचा इतिहास एखाद्या 'बखरी'प्रमाणे 'दस्तऐवज' म्हणून पुढील सर्व पिढीसमोर ठळकपणाने अधोरेखित करणारे आहे. कै. दीनानाथ साखळे यांचे हे लेखन गेली अनेक वर्षे फायलीत पडून होते. सौ.वंदना यांच्या हाती ज्या वेळी ही फाईल लागली व ती त्यांनी सहज वरवर चाळली, त्यावेळी प्रथमदर्शनीच त्या लेखनातील सजगता आणि त्यातील अभ्यासात्मक दृष्टिकोनाचा अंदाज सौ.वंदना यांना आला आणि हे एक बहुमोल साहित्य असल्याची जाणीव त्याचक्षणी झाली. त्यामुळे सौ.वंदना यांनी या बंदिस्त फायलीतील त्यांच्या लेखनाला पुस्तक रूपाने उचित न्याय देण्याचे ठरविले.

अधिक वाचा:विश्वकर्मा : पांचाळ समाजाच्या अस्तित्वाचा शोध