महावृत्तविषयी

महावृत्तविषयी...

'महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त)' या संस्थेची स्थापना १३ एप्रिल १९९१ रोजी, थोर कायदे तज्ज्ञ, जागतिक कीर्तीचे विचारवंत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताद्बीच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञ प्रा.(कै) राम जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेल्या या वृत्तसंस्थेच्या मुख्यसंपादक पदाची जबाबदारी श्री. कुमार कदम यांनी स्वीकारली. ज्येष्ठ पत्रकार कै. चंद्रकांत भोगटे, कै. आत्माराम सावंत तसेच सर्वश्री रमेशचंद्र वाबगावकर (मुंबई), शांताराम जोशी (औरंगाबाद), रामभाऊ जोशी (पुणे), माधवराव रानडे (मुंबई) आदी वृत्तपत्र साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातील कर्तबगार मंडळींनी या वृत्तसंस्थेला प्रारंभी आकार दिला. त्यामुळे राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांना बातम्यांबरोबरच सामाजिक प्रश्न, सार्वजनिक आरोग्य, वृक्ष संवर्धन, जल व्यवस्थापन, शालेय शिक्षण, कृषी, फलोद्यान, विज्ञान आदि विविध विकासात्मक विषयांवर दर्जेदार साहित्य पुरविले गेले आणि संस्था स्थापन करण्यामागील उद्देश सफल झाला. आजही राज्यातील विविध वृत्तपत्रांना बातम्यांसोबत अशाच दर्जेदार साहित्याचा पुरवठा करून संस्थेने आपले 'मिशन' पुढे सुरू ठेवले आहे.


सुरवातीला ही सेवा दूरध्वनी, टपाल तसेच कुरियर सेवा या माध्यमातून दिली जात असे. मात्र ही सेवा अधिक जलद गतीने आणि प्रभावीपणे वृत्तपत्रांकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे 'ई-मेल'द्वारा ही सेवा देण्यास येत असते. त्याशिवाय लेख आणि बातम्यांप्रमाणेच महत्त्वाचे क्षण टिपणारी छायाचित्रेही पाठविली जात आहेत.


'महाराष्ट्र वृत्त सेवे'चे आणखी एक वैशिष्टय म्हणजे ही सेवा प्रत्येक वृत्तपत्राला त्याच्याकडील संगणकामध्ये बसविण्यात आलेल्या भाषेच्या 'सॉप्टवेअर'मधील 'फॉन्ट'मध्ये उपलब्ध होते. उदा. एखाद्या वृत्तपत्राकडे 'श्रीलिपी' असेल तर 'महाराष्ट्र वृत्त सेवे'कडून 'ई-मेल'द्वारा पाठविला जाणारा सर्व मजकूर सदर वृत्तपत्राला 'श्रीलिपी'मध्येच मिळतो व तो थेट 'डाऊनलोड' करता येतो; तो पुन्हा टाईप करावा लागत नाही. त्यात संबंधित वृत्तपत्राचा वेळ आणि मेहनत वाचते. हा सर्व मजकूर संपादकीयदृष्टया पूर्णपणे संस्कारीत म्हणजे 'एडीट' केलेला असतो.


'महाराष्ट्र वृत्त सेवे'तर्फे अनेक मराठी दैनिकांकडे बातम्या आणि लेख नियमितपणे पाठविले जात आहेत. त्याकरीता महाराष्ट्र, बेळगाव आणि गोव्यातील मराठी दैनिकांचे 'ई-मेल पत्ते' तसेच 'फॉन्ट्स'ची माहिती 'महावृत्त'कडे उपलब्ध आहे.

'महावृत्त डॉट कॉम'च्या माध्यमातून संस्थेने आधुनिक संगणक युगात पदार्पण केले आहे.