इतर बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयांना दरकरारानुसार औषध खरेदीस मुदतवाढ

मुंबई - औषधांचा साठा संपलेल्या किंवा संपुष्टात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालयांना शासनाने विहित केलेल्या अस्तित्वातील दरकरारानुसार खरेदी करण्याची परवानगी देण्यासह संपुष्टात आलेल्या औषधी विषयक बाबींच्या खरेदीसाठीच्या दरकरारास मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखाली १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्नित रुग्णालये आहेत. त्यांच्याकडून दरकरार करण्यात आलेल्या विविध औषध कंपन्यांकडून आवश्यक औषधे आणि इतर वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २६ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार शासनाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी हाफकीन बायोफार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेड यांच्याकडील औषध कक्षाकडून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कक्षाकडे शासनाच्या आरोग्य संस्थांकडून औषधांची मागणी नोंदविण्यात आली असून त्यांच्याकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा संपलेल्या किंवा संपुष्टात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना शासनाने विहित केलेल्या मात्र, मुदत न संपलेल्या दरकरारानुसार खरेदी करण्यास आज मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने औषधी विषयक बाबींच्या खरेदीसाठी विहित कार्यपद्धतीनुसार केलेले काही दरकरार संपुष्टात आले आहेत. तातडीच्या खरेदीसाठी या दरकरारांस देखील मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना ३१ जानेवारी २०१८ पर्यंत किंवा हाफकीन कॉर्पोरेशनकडून औषधांचा पुरवठा सुरळित होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी औषध खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कुमार कदम यांचा ब्लॉग..