इतर बातम्या

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पोलादपूर तालुक्यातील आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर

पोलादपूर (शैलेश पालकर) - तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बहुसंख्येने वास्तव्य करणाऱ्या आंबेडकरी जनतेने भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पोलादपूर शहरातील रस्त्यावर उतरून कडकडीत बंदचे आवाहन करणारी रॅली काढली. आंबेडकरी जनतेच्या तीव्र भावनांचा आदर करीत पोलादपूर व्यापारी असोसिएशनने दुकाने बंद करीत उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

भीमा कोरेगांव येथील दगडफेक, एका व्यक्तीचा मृत्यू आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर भारिपनेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी संपूर्ण 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील हळदुळे, तुर्भे, पार्ले, कापडे, पायटे, वाकण, पोलादपूर तसेच अन्य ग्रामीण भागातील भारतीय बौध्दजन महासभा, भारिप बहुजन महासंघ आणि ऍड.प्रकाश आंबेडकर तसेच आनंदराज आंबेडकर यांचे अनुयायी कार्यकर्ते तसेच बौध्द समाजबांधव आणि महिला मोठया संख्येने पोलादपूर शहरातील रस्त्यावर उतरून व्यापारी आणि अन्य विक्रेत्यांना रॅलीद्वारे व्यवसाय व धंदे बंद करण्याचे आवाहन करू लागले.

या रॅलीचे नेतृत्व भारतीय बौध्द महासभेचे जिल्हासचिव अनिल बाबू मोरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र निकम, बौध्दजन पंचायत समितीचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ सकपाळ, कोषाध्यक्ष सुदास शि.मोरे, आर.के.मोरे, अशोक मोरे, प्रकाश जाधव, लक्ष्मण दगडू पवार, पोलादपूर नगरपंचायतीच्या नगरसेविका रेखा सोनावणे, सतीश गायकवाडपोलादपूर भावकीचे अध्यक्ष उमेश पवार, ॠषिकेश हाटे, गजानन सोनावणे, राजन सोनावणे तसेच विविध गावांतील सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे केले. रॅलीमध्ये अंकिता भालेराव, नमिता पवार, सीमा मोरे आणि अनेक महिला व तरूणींचाही लक्षणीय सहभाग दिसून आला.

पोलादपूर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छ.शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाला अभिवादन करून बंदचे आवाहन करणारी ही रॅली पोलादपूर एसटी स्थानक परिसर, पोलादपूर बाजारपेठ, महाबळेश्वर रस्त्यामार्गे तहसिल कार्यालयापर्यंत गेली. तहसिल कार्यालयाबाहेर तहसिलदार शिवाजी जाधव यांना प्रमुख मंडळींनी निवेदन देऊन रॅलीची सांगता झाली. दिवसभरात पोलादपूर शहरात कडकडीत बंद राहिला आणि कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही.

कुमार कदम यांचा ब्लॉग..