इतर बातम्या

अमरावती विद्यापीठात ‘सूत्रसंचालन आणि निवेदन’ या विषयावर कार्यशाळा

अमरावती - हल्लीच्या समाजात दुसऱ्याला टाकून बोलण्याची प्रवृत्ती इतकी बळावत चाललेली आहे, तसेच हल्ली अनेकदा चांगले शब्द कानावर पडतच नाहीत, गोड बोलणे सगळ्यांना जमत नसते, कारण शब्दांतून साखरपेरणी करता येणे, हीसुध्दा एक अद्‌भूत कला आहे, मधुर बोलणाऱ्या व्यक्तीला सहज कुणाचेही मन जिंकता येते, यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी ही पात्रता अंगी असावी लागते, असे प्रतिपादन प्रख्यात निवेदक नितीन भट यांनी अमरावती येथे केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सूत्रसंचालन आणि निवेदनया कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना भट यांनी आवाज, भाषाप्रभुत्व, बोलण्यातील चढउतार, समाजात घडणा­या घडामोडींबद्दल सजगता आणि हजरजबाबीपणा हे यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी आवश्यक भांडवल असल्याचे सांगून निवेदनाची कला साध्य करण्याचे हुकमी मार्ग उलगडून सांगितले. यावेळी भट यांनी शेरोशायरी, कविता, किस्से, सुभाषिते यांना स्वत:च्या समर्थ विवेचनाची जोड देत निवेदनकौशल्य कसे आत्मसात करावे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. रेडिओवरील उद्घोषणा, भाषण, प्रकट मुलाखत, वृत्तनिवेदन या विषयांवरही त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून उहापोह केला. आपल्या व्याख्यानातून त्यांनी काही विद्यार्थ्यांकडून वृत्तवाचनाचे प्रात्यक्षिकही करवून घेतले.

या उपक्रमाचे समन्वयक डॉ.हेमंत खडके यांनी सुरुवातीला नितीन भट यांचा परिचय करून दिला. विद्यापीठ विभागांतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाची संधी मिळावी, या उद्देशाने कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम विद्यापीठात सलग दुस­या वर्षी राबविण्यात येत आहे.

मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण ३ ऑक्टोबरपासून

मुंबई - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहेअशी माहिती जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी आज दिली.

कार्यक्रमानुसार मतदार याद्यांची दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिद्धी करण्यापूर्वी तयारीचा भाग म्हणून मतदार याद्यातील त्रुटी व उणीवांचा शोध घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच मतदार यादीमधील मयत आणि दुबार मतदारांची नावे शोधून ही नावे कमी करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.  प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भागसेक्शनच्या ग्रामसभास्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्यूए सोबत बैठक तसेच नावांची खातरजमा करण्याचे काम दि. ७ ऑक्टोबर आणि दि. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी केले जाईल. रविवार दि. ८ ऑक्टोबर आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत दि. ५ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यवतीकरण आदी ‍दि.२० डिसेंबर २०१७ पर्यंत केले जाईल आणि दिनांक ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१७ या कालावधीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये प्रामुख्याने १८ ते २१ वयोगटातील तरुण व पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  १ जानेवारी  २०१७ ची मूळ मतदार यादी तसेच पुरवणी याद्यांचे विलनीकरण व एकत्रीकरण करुन प्रारुप मतदार यादी दि.३ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान केंद्रावर तसेच मध्यवर्ती मतदान केंद्रात (सीपीएस) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दि. ८ ऑक्टोबर व दि.२२ ऑक्टोबर २०१७ या दोन सुट्टीच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए)  यांची नियुक्ती करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धारांगोळी स्पर्धासायकल रॅलीपथनाटये अशा कार्यक्रमांचेही आयोजन करुन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीवगळणीपत्त्यामधील दुरुस्ती आदींसाठीचे विहीत नमुने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारीसंबंधित बीएलओ स्तरावर करता येईल शिवाय http://www.nvsp.in/ या वेबपोर्टलवर योग्य त्या पुराव्यांसह ऑनलाईनरित्या अर्ज करता येईल.

नागोठणे विभागातील आदिवासीवाड्यांत काळा पाऊस ! भातशेती, भाजीपाला पीक धोक्यात

नागोठणे - विभागातील पूर्वेकडील आदिवासीवाड्यांमध्ये शुक्रवारी दुपारी पाऊस पडताना पावसाच्या पाण्याबरोबर काळ्या रंगाचे रसायन खाली पडल्याचा प्रकार घडला आहे. हे रसायन नक्की कोठून आले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी साचलेल्या काळ्या रसायनामुळे भातशेती तसेच भाजीपाला पीक नष्ट होईल अशी भीती आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे.

याबाबत संबंधित पाण्याची तसेच साचलेल्या फेसाची येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे पर्यावरण व जल तज्ञ प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, आम्ही पाच चाचण्या केल्या असून त्यातील तीनमध्ये दोष आढळून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केलेल्या चाचणीत पाण्याचा रंग काळसर आढळून आला असून त्यात ६.०५ आम्ल गुणधर्मी पाणी असल्याचे दिसून येत आहे. शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेपेक्षा पॅरामीटरच्या टोटल सॉलीडमध्ये दूषित पाणी प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले आहे. डॉ. जाधवर यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पडलेला पाऊस आम्लयुक्त होता व काळ्या धुरांचा ढग पाण्याच्या ढगात मिसळल्याने पावसाबरोबर हा काळा धूर खाली जमिनीवर पडल्याने पाणी प्रदूषित झाले असे त्यांनी स्पष्ट केले. पाणी आम्लयुक्त असल्याने ते आरोग्यास घातक असून त्यातून मेंदू, श्वसन तसेच पोटाचे गंभीर आजार बळावतात असे त्यांनी सांगितले.   

शहरापासून ५ किलोमीटर अंतरावरील पूर्वेकडील डोंगरावर वासगाव, कातकरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी,लाव्ह्याची वाडी आदी आदिवासीवाड्या आहेत. येथील आदिवासींचा भाजीपाला पिकवून विकण्याचा मुख्य व्यवसाय आहे, तर काही जण भातशेती करतात. शुक्रवारी दुपारी पाऊस पडल्याने सुरुवातीला उग्र वासाची दुर्गंधी आली व त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर पडलेले पाणी काळे असल्याचे निदर्शनास आले असे वासगाव येथे राहणारे पाटणसई ग्रा.पं. चे माजी सरपंच झिमाशेठ कोकरे, काशिनाथ हंबीर व इतर आदिवासी बांधवानी स्पष्ट केले. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा गाळ खाली बसल्यानंतर रसायनमिश्रित काळ्या रंगाचा थर खाली बसला असल्याने भातशेतीला ते धोकादायकच असून तयार झालेल्या भाजीपाल्याला सुद्धा याचा फटका बसणार असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडा, रामा बरतूड, चंद्रकांत हंबीर, कमलाकर बांगारा यांनी सांगितले. मोरू हंबीर, महादू निरगुडा, संतोष भला आणि आदिवासी महिलांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात सुद्धा एकदा असा पाऊस पडला होता. वांगी, शिराळी, कारली, मिरची, काकडी, पडवळ, भेंडी आदी भाज्यांचे पीक आम्ही घेत असून त्यावेळी पडलेल्या काळ्या पावसामुळे केलेले बहुतांशी पीक नष्ट झाले होते व प्रत्येक शेतकऱ्याला २० ते ४० हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते असे त्यांनी स्पष्ट केले. या भागात फेरफटका मारला असता, ढोकवाडीतील ग्रामस्थांना त्याचा जास्त फटका बसला असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावालगत एक विहीर असून विहिरीच्या पाण्यावर सुद्धा काळ्या रंगाचा तवंग साचला असून उन्हाळ्यात यातील पाणी जलवाहिनीद्वारे परिसरातील आदिवासीवाड्यांवर पुरवले जाते. पावसाळ्यात बहुतांशी कुटुंबे पावसाच्या पागोळीचे पाणी गाळून घरात वापरत असतात व उणीव भासल्यास संबंधित विहिरीचे पाणी आणत असतात असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शुक्रवारी सकाळी पाणी भरले असून आता सगळीकडेच काळे पाणी साचले असल्याने आमच्या मुलाबाळांसाठी आता पाणी तरी कोठून आणायचे, असा सवाल त्यांनी व्यक्त केला. 

प्रत्येक विद्यार्थ्याने योगाचे महत्व जाणून घेणे काळाची गरज : वृषाली चव्हाण

नागोठणे  - धावपळीच्या जीवनात अनेक आजारपणांना सामोरे जावे लागत असून बालकवर्ग सुद्धा त्यातून सुटत नाही. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निरोगीपणाने जीवन जगायचे असेल, तर प्रत्येक विद्यार्थ्याने योगाचे महत्व जाणून घेणे काळाची गरज असल्याचा मोलाचा सल्ला नवी मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या वृषाली चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला. नवरात्रौत्सवानिमित्त शेतपळस येथील प्रसिद्ध अशा आकादेवी मंदिराला आपले पुत्र राकेश यांच्यासमवेत भेट देऊन दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील पीएनपी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पतंजली बिस्कीटचा पुडा आणि थंड पेयाचे वितरण केले. यावेळी शाळा समितीचे माजी अध्यक्ष गणपत डाकी, मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांचेसह शिक्षक उपस्थित होते. 

अधिक वाचा:प्रत्येक विद्यार्थ्याने योगाचे महत्व जाणून घेणे काळाची गरज : वृषाली चव्हाण

कुमार कदम यांचा ब्लॉग..