इतर बातम्या

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित ‘रासरंग २०१७’ला दिमाखदार सुरुवात

डोंबिवली - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या रासरंग २०१७ला गुरुवारी आपल्या पसंतीची पावती देत भर पावसात डोंबिवलीकरांनी विक्रमी हजेरी लावत इथल्या गरब्याचा आनंद लुटला. तुफान पावसाच्या सोबतीने डोंबिवलीकर रसिकांच्या धम्माल उत्साहात गुरुवारी या रासरंग २०१७ची दिमाखदार सुरुवात झाली. दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्या बीटर्झ बँडच्या साक्षीने डोंबिवलीकर तरुणाई आणि नागरिकांची पावलं गरब्याच्या तालावर थिरकली. यावेळी रासरंग २०१७ च्या पहिल्या दिवशीच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मोबाईल, घडयाळ आदी पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
झी युवावर सध्या गाजत असलेल्या फुलपाखरू या मालिकेची संपूर्ण टीम उद्या शनिवारी रासरंग २०१७ ला उपस्थित राहून डोंबिवलीकरांसोबत रास गरब्याचा आनंद लुटणार आहेत. हिंदी, मराठी, गुजराती मालिका चित्रपटांतील सुप्रसिद्ध कलाकार देखील डोंबिवली रासरंग २०१७या कार्यक्रमाला हजेरी लावणार असून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डोंबिवलीतील महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात स्त्रियांसाठी मराठमोळ्या संस्कृतीने बहरलेला भोंडला हा खेळ खेळला जाणार आहे.
डोंबिवलीच्या नागरिकांसाठी भव्य प्रमाणावर खेळवला जाणारा डोंबिवली रासरंग २०१७हा एक प्रोफेशनल दांडिया असून यामध्ये महिलांसाठी, कुटुंबासाठी वेगळे विभाग असणार आहेत. प्रत्येक दिवशी उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना विशेष पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना : पहिला हप्ता ऑक्टोबरमध्ये

मुंबई - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दोन हप्त्यांमध्ये शिक्षण शुल्क रक्कम देण्यात येणार आहे. पहिला हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तर दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा होणार आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य शासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संधी उपलब्ध होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना विद्यार्थी केंद्रीत आहे. या योजनेमुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आणि इतर काही विभागाअंतर्गत असणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी विनाअनुदानित आणि कायम विनाअुनदानित संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना ५० टक्के मर्यादेपर्यंतची शिक्षण शुल्काची रक्कम दोन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नीत बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून देण्यात येणारा आधार क्रंमाक प्राप्त करुन सदर आधार क्रंमाक बँकेच्या खात्याशी संलग्न करुन घेण्यात येत आहे. Aadhaar Payment Bridge System द्वारे शासनाच्या विविध योजनांचे अनुदानशिष्यवृत्तीप्रतिपूर्ती इत्यादीची रक्कम थेट लाभार्थीच्या (DBT) खात्यात पाठविता येईल अशी कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘जलयुक्त’चे ‘जलतज्ज्ञां’कडून कौतुक

मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे भरभरुन कौतुक करुन यात आणखी लोकसहभाग वाढवावा, अशी सूचना जलबिरादरीचे संस्थापक जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी आज येथे केली.जलयुक्त शिवार कार्यक्रमात लोकसहभाग वाढविण्यासंदर्भात मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह हे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी राज्य शासनाने राबविलेल्या या योजनेच्या माहितीचे तसेच राबविलेल्या अभिनव उपक्रमांचे सादरीकरण राजेंद्र सिंह यांच्यासमोर करण्यात आले. तसेच राज्य शासनाने राबविलेल्या पाणलोट क्षेत्राचे गाव नकाशे तयार करून ग्रामपंचायतमध्ये प्रदर्शित करण्याच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली.

जलयुक्त शिवार योजना राबविताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात राजेंद्र सिंह यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून लोकांच्या फायद्यासाठी व निसर्गाच्या संवर्धनासाठी जलयुक्त शिवार सारख्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे राजेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कामे झाली आहेत. नाला खोलीकरणगॅबियन बंधाऱ्याचा प्रयोग असे अनेक वेगवेगळे प्रयोगही झाले आहेत. जलयुक्तची कामे करत असताना नवीन जलस्त्रोत निर्माण करण्याबरोबरच जुन्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेत अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न असून, पुढील काळात यावर भर देण्यात येईल, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

या बैठकीस नंदूरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टीवर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवालजलबिरादरीचे राज्याचे कार्याध्यक्ष किशोर धारियाजलसाक्षरता केंद्राचे पांडेजलअभ्यासक डॉ. स्नेहल धोंडेकार्यकारी अभियंता प्रकाश मिसाळ यांच्यासह विविध जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

अमरावती विद्यापीठात कुलगुरुंचा रॅगिंगविरोधात विद्यार्थ्याशी ऑनलाईन संवाद

अमरावती - अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी रॅगिंगला आळा बसावा, या संदर्भात विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागातील सर्व विद्यार्थ्याशी ऑनलाईन व्हीडीओ कॉन्फरन्सगद्वारे संवाद साधला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले, भारतीयांना श्रीमंत संस्कृती लाभली आहे; पण आपल्या समृद्ध संस्कृतीचे स्मरण प्रत्येकाने वारंवार करावे आणि त्याची जाण ठेवून आपल्या जीवन कार्याला गती देऊन सफल होण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. अतिथी देवो भव: या उक्तीप्रमाणे कुठल्याही महाविद्यालयांमध्ये नवीन येणा­ऱ्या विद्यार्थ्याला अतिथीप्रमाणे समजून त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सकारात्मक दृष्टीने विद्यार्थ्यांनी कार्य करण्याची गरज आहे.

विद्यापीठ अनुदान मंडळाने (यु.जी.सी.) ७ जून, २००९ रोजी रॅगिंग विरोधात परिपत्रक काढून रॅगिंगला आळा बसावा, अशा सूचना सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत. त्यापूर्वी राघवन कमिशनने रॅगिंगला समर्थन दिले होते. रॅगिंगमुळे विद्याथ्र्याचे नेतृत्व विकसित होते; पण त्यावेळी रॅगिंग सकारात्मक स्वरुपाची होती. रॅगिंगला ज्यावेळी विकृत स्वरुप प्राप्त झाले आणि विद्यार्थी आत्महत्या करु लागला, त्यावेळी रॅगिंगवर बंदी आणण्यात आली, अशी माहिती देतांना कुलगुरु पुढे म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोन प्रत्येक विद्यार्थ्याला ठेवावयाचा आहे. लहान्याला मदत करण्याच्या भावनेने मी वागेन, कोणाचेही शोषण करणार नाही आणि होवू देणार नाही, असा ठाम निश्चय मनाशी ठेवीन. शिक्षण घेणारे विद्यार्थी मग ते महाविद्यालयातील असो वा विद्यापीठातील असो सर्व सूज्ञ आणि संस्कारित आहे. त्यांचेकडून सदैव चांगलेच वातावरण निर्माण होईल, असा विकास व्यक्त करुन कोणाच्याही सन्मानाला, भावनांना माझ्यामुळे ठेच पोहोचणार नाही आणि एक मित्र, सवंगडी म्हणून वागण्यावर प्रत्येकजण भर देण्याचा व जीवन जगण्याचा संकल्प करतील, अशी आशा विद्याथ्र्यांकडून कुलगुरुंनी व्यक्त केली.

व्यासपीठावर कुलसचिव डॉ.अजय देशमुख व अधिष्ठाता तथा अॅन्टी रॅगिंग समितीचे सदस्य डॉ.मनोज तायडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणामधून डॉ. तायडे यांनी माहिती दिली. युटुबवर कुलगुरु डॉ.चांदेकर यांनी अॅन्टी रॅगिंग विषयावर केलेल्या भाषणाच्या माहितीचा व्हिडीओ एस.जी.बी.ए.यु. लाईफ स्ट्रीमवर उपलब्ध असून त्याला विद्यार्थ्यांकडून खूप लाईक्स मिळाल्यात.

कुमार कदम यांचा ब्लॉग..