महावृत्त

ठाणे जिल्हा परिषदेसह १० नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्या; तसेच १० नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. १३) मतदान होत आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसह विविध ठिकाणच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या क्षेत्रात एकूण ७ लाख ३ हजार ३७८ मतदार आहेत. त्यात ३ लाख २५ हजार ९३२ महिला, ३ लाख ७७ हजार ४४४ पुरूष; तर २ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी ९३७ मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागा आहेत. त्यातील खोणी निवडणूक विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ५२ जागांसाठी १५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहापूर (जागा २८), मुरबाड (१६), कल्याण (१२), भिवंडी (४२) आणि अंबरनाथ (८) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी २९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

अधिक वाचा:ठाणे जिल्हा परिषदेसह १० नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

सौदी अरबने ३५ वर्षांनंतर चित्रपटगृहांवरील बंदी उठवली

रियाध (सौदी अरब) - सौदी अरबकडून ३५ वर्षांपूर्वी चित्रपटगृहांवर लागू करण्यात आलेली बंदी उठवण्यात आली असून येथे चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सौदी अरबमध्ये मार्च २०१८ पासून चित्रपटगृहे चालू होऊ शकणार असल्याचे सौदीच्या संस्कृती आणि मंत्रालयाने जाहीर केले आहे. सौदीचे संस्कृती आणि माहिती मंत्री अव्वाद अल अव्वाद यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, केवळ तेल उत्पादनवर अवलंबून असणाऱ्या सौदीच्या अर्थव्यवस्थेत यामुळे विविधता येणार आहे.

अधिक वाचा:सौदी अरबने ३५ वर्षांनंतर चित्रपटगृहांवरील बंदी उठवली

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून ५ दहशतवादी ठार एकाला अटक

श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू-काश्‍मीरमधील बारामुल्ला आणि हंदवाडा भागात आज,मंगळवारी सुरक्षा दलांनी चकमकींत पाच दहशतवाद्यांना ठार केले असून एकाला जिवंत पकडण्यात यश मिळवले आहे. बारामुल्ला आणि हंदवाडा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर त्यांनी केलेल्या कारवाईत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करणयास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी मारले गेले, तर एकाला सुरक्षा दलने जिवंत पकडले. यावर्षी काश्‍मीर खोऱ्यात दोनशे पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे.

मुंबईत अँकर तरुणीची आत्महत्या

मुंबई -  मुंबईतील मालाडमधील मालवणी परिसरातील मानवस्थळ इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील, १५०१ क्रमांकाच्या घरातून उडी घेत एका २५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना आज,मंगळवारी सकाळी घडली आहे. आत्महत्या करणाऱ्य या तरुणीचे नाव अर्पिता तिवारी असे असून ती तरुणी इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करत होती. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्पिताला पाहून रहिवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.मालवणी पोलिसांनी या अपघाती मृत्यूची नोंद केली असून या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.